'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 11:28 IST2025-12-14T11:24:39+5:302025-12-14T11:28:53+5:30
Jayant Patil Sanjay Savkare: विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना जयंत पाटलांनी पोलिसांवर सडकून टीका केली. पोलीस हजामती करताहेत का? असा संतप्त सवाल त्यांनी केला. त्याला मंत्री संजय सावकारेंनी आक्षेप घेताच पाटलांचा पारा चढला आणि दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली.

'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
"सामाजिक कार्यकर्त्यावर हल्ला कोण करतंय? १५ दिवस झाले तरी एक माणूस सापडलेला नाही. मग पोलीस काय हजामती करतात की काय, मला आश्चर्य वाटते. संध्याकाळी जेवताना हॉटेलच्या समोर माणसाला मारहाण होते आणि त्याचा कोणताच पुरावा लागत नाही", अशा शब्दांत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी संताप व्यक्त केला. पोलीस काय हजामती करतात का? या त्यांच्या विधानावर मंत्री संजय सावकारे यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर जयंत पाटलांचा पारा चढला. ते म्हणाले, माझी मराठी कमी आहे. तुम्ही मंत्री आहात पर्यायी शब्द सांगा म्हणत जयंत पाटलांनी सावकारेंना सुनावले. शब्द न हटवण्यावर जयंत पाटील ठाम राहिले.
अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत बोलताना जयंत पाटील यांनी राम खाडे यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेचा उल्लेख केला. "आमच्या पक्षाचे कार्यकर्ते राम खाडे पदाधिकारी आहेत. सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी अनेक देवस्थानांचे जमीन घोटाळे बाहेर काढले आहेत. मधल्या काळात त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आले. सरकारने ते काढून घेतले. त्यांचा बंदुकीचा परवानाही नुतनीकर करून दिला नाही."
जयंत पाटील म्हणाले, 'त्याचा एक पाय, एक हात तुटला'
"पंधरा दिवसांपूर्वी नगर जिल्ह्यात त्यांच्यावर हल्ला झाला. मेला आहे म्हणून माणसांनी सोडला. दहा-बारा जणांनी एका वेळी हल्ला केला. जवळपास मेलेला होता. पण, कसा बसा तो वाचला. आता तो शुद्धीवर आला आहे. त्याचा एक पाय तुटला. एक हात तुटला. पंधरा दिवस झाले, तरी एक माणूस सापडला नाही, मग पोलीस काय हजामती करतात की काय, मला आश्चर्य वाटत आहे", असा संताप जयंत पाटलांनी पोलिसांच्या तपासावर व्यक्त केला.
सावकारेंनी आक्षेप घेताच जयंत पाटलांचा चढला पारा
मंत्री संजय सावकारे म्हणाले, 'पोलीस काय हजामती करतात काय, असा शब्द वापरू नका.' जयंत पाटील म्हणाले, 'मग काय शब्द वापरू, तुम्ही पर्याय द्या ना. माझी मराठी कमी आहे."
सावकारे म्हणाले, 'असे शब्द वापरू नका, प्लीज.' जयंत पाटील म्हणाले, 'असेच शब्द वापरले पाहिजेत. दुसरं काय वापरणार?' सावकारे म्हणाले, 'तुम्ही चुकीचे शब्द वापर आहात.'
हजामती म्हणजे काय तुम्हाला माहितीये का? जयंत पाटलांचा सावकारेंना सवाल
सावकारेंनी आक्षेप घेतल्यानंतर जयंत पाटील त्यांना म्हणाले की, 'हजामती म्हणजे काय, माहितीये का तुम्हाला? हजामतीचा अर्थ सांगा ना.', सावकारे म्हणाले, 'तु्म्ही सांगा.' त्यानंतर जयंत पाटील पुन्हा म्हणाले, 'तुम्हाला अर्थ कळत असेल, तर तुम्ही सांगा. मंत्री आहात तुम्ही.' त्यावरून सावकारे म्हणाले, 'तुम्ही पण होता ना मंत्री.'
जयंत पाटील पुढे म्हणाले, 'तुम्ही मला थांबवत आहात ना, मग मला हजामती शब्दाचा अर्थ सांगा.' सावकारे अध्यक्षांना म्हणाले, 'हे शब्द काढून टाका.'
शब्द कसा काढता येईल? जयंत पाटलांचा सवाल
जयंत पाटील तालिका अध्यक्षांना म्हणाले की, "अध्यक्ष महोदय कसा काढता येईल शब्द? तो असंसदीय नाही. मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये.'
त्यानंतर तालिका अध्यक्ष म्हणाले, 'रेकॉर्डवरून हे शब्द काढण्यात येत आहे.' त्यानंतर जयंत पाटील म्हणाले, 'कुठले?' अध्यक्ष म्हणाले, 'हजामती.' जयंत पाटील पुन्हा म्हणाले, 'कारण काय? सांगा ना? ते असंसदीय आहे का? विनाकारण... मी पोलिसांवर टीका करतोय, तुमच्यावर (सरकारवर) टीका करत नाही. तुम्ही कारण सांगा ना? तो शब्द असंसदीय आहे का? असंसदीय असेल, तर काढा. तपासा. असेल, तर काढा, नसेल, तर ठेवा.' त्यानंतर हा वाद मिटला.