पुणे - राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाला आज एक महिना पूर्ण झाला आहे. या एक महिन्याच्या काळात बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. २८ जानेवारी २०२६ रोजी मुंबईहून बारामतीला जाणाऱ्या अजित पवारांच्या विमानाचा बारामती विमानतळाजवळ अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात अजित पवारांसह ५ जणांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या आकस्मिक निधनाने अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली. अजित पवारांचे जाणं हे पवार कुटुंबासाठी मोठा आघात होता. आज २८ फेब्रुवारी असून या घटनेला १ महिना पूर्ण झाला आहे. त्यामुळे रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी दादांसोबतच्या आठवणींना उजाळा देत एक पोस्ट केली आहे.
आमदार रोहित पवार यांनी पोस्ट केलीय की, जे घडलंय ते झोपेत पडलेलं एक वाईट स्वप्न होतं असं अजूनही वाटतं आणि म्हणूनच त्या काळ्या दिवशी अजितदादांच्या या नंबरवर कॉल केला. पण कॉलही उचलला गेला नाही आणि नेहमीचा तो भारदस्त आवाजही ऐकू आला नाही..खूप वेदनादायी..! असं म्हणत त्यांनी व्हॉट्सअप चॅटचा स्क्रिनशॉट दाखवला आहे. तर सुप्रिया सुळे यांनीही अजितदादांसोबतचा फोटो पोस्ट करून त्यांची उणीव कायम भासेल असं म्हटलं आहे. आपले अजितदादा सोबत नाहीत, हे पचविणे अजूनही कठीण जात आहे. अजितदादांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरुन निघणार नाही. दादा, तुम्ही कायम स्मरणात राहाल. तुमच्यासोबतच्या प्रसन्न क्षणांच्या आठवणी आयुष्यभर कायम सोबत राहतील अशी भावना सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली.
काय घडलं होते 'त्या' दिवशी?
२८ जानेवारी २०२६ ची सकाळ...सगळ्यांच्या दिवसाची सुरूवात झाली होती. माध्यमांमध्येही विविध बातम्या सुरू होत्या. तेव्हा अचानक ८.४५ च्या सुमारास बातमी झळकते, बारामती येथे विमान कोसळले. या विमानात उपमुख्यमंत्री अजित पवार प्रवास करत होते हे समोर आल्यानंतर सगळ्यांचे लक्ष या बातमीने वेधले. तातडीने माहिती गोळा करण्याचं काम सुरू झाले. तोपर्यंत स्थानिक लोकांमुळे या घटनेचे व्हिडिओ समोर आले. कोसळलेल्या विमानाला लागलेली आग आणि आजूबाजूला पसरलेले विमानाचे अवशेष लोकांना दिसले. पाहता पाहता घटनास्थळी लोकांची गर्दी होऊ लागली.
या विमानात कोण कोण होते याची माहिती समोर आली. त्यात एक नाव होते उपमुख्यमंत्री अजित पवार...अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला. या भीषण अपघातात अजित पवारांचे निधन झाले ही बातमी पसरते आणि अवघा महाराष्ट्र शोकाकुल होतो. मुख्यमंत्र्यांपासून राजकीय नेते बारामतीच्या दिशेने निघतात. पवार कुटुंबातील सदस्य तातडीने घटनास्थळी पोहचले. शरद पवारही मुंबईहून बारामतीच्या दिशेने रवाना झाले. अजित पवारांच्या निधनाने कार्यकर्त्यांमध्ये शोक पसरतो, नेत्यांच्या डोळ्यातूनही पाणी येते. जे अजित पवार सकाळपासून कामाला सुरुवात करतात. त्यांच्या निधनाची बातमी सकाळीच आलेली पाहून अनेकांना धक्का बसतो. या धक्क्यातून आजपर्यंत कार्यकर्ते सावरले नाहीत. आजही अनेकांना अजित पवार परततील अशी आशा आहे.
Web Summary : A month after Ajit Pawar's death, Rohit Pawar shared a screenshot of a WhatsApp call, expressing his grief. Supriya Sule also posted a photo, remembering him fondly. The tragic plane crash deeply impacted Maharashtra, leaving a void in the Pawar family and political circles.
Web Summary : अजित पवार के निधन के एक महीने बाद, रोहित पवार ने व्हाट्सएप कॉल का स्क्रीनशॉट साझा किया, अपना दुख व्यक्त किया। सुप्रिया सुले ने भी उनकी याद में एक तस्वीर पोस्ट की। दुखद विमान दुर्घटना ने महाराष्ट्र को गहरा सदमा पहुंचाया।