अपघातात नवरदेवासह एक ठार

By Admin | Updated: May 10, 2014 22:51 IST2014-05-10T22:39:50+5:302014-05-10T22:51:27+5:30

बोहल्यावर चढल्यानंतर २४ तासातच काळाचा घाला

One killed with Nawarda in an accident | अपघातात नवरदेवासह एक ठार

अपघातात नवरदेवासह एक ठार

देऊळगावराजा : विवाहाच्या रेशीम गाठी बांधल्या गेल्या. भावी आयुष्याचे ते स्वप्न रंगवू लागले. मात्र या घटनेला २४ तास उलटत नाही तोच नवरदेवावार काळाने घाला घातला. नवरदेवासह दोघांचा कार अपघातात मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी देऊळगावराजा येथे घडली. देऊळगावराजा येथील नंदू शिंगणे यांचा मुलगा अनिल कामानिमित्त गुजरात येथे वास्तव्यास होता. मुलगा उपवर झाल्याने त्याचा विवाह सिंदखेडराजा येथील मेहेत्रे कुटुंबातील स्वाती नामक मुलीशी ८ मे रोजी थाटामाटात संपन्न झाला. विवाह सोहळा आटोपल्यानंतर त्याच दिवशी वरपक्षाची मंडळी नववधूला घेऊन देऊळगावराजा येथे पोहोचली. शुक्रवार, ९ मे रोजी पत्नीला माहेरी पोहोचविण्यासाठी नवरदेव आणि नवरदेवाचा मावसभाऊ सिंदखेडराजा येथे मारूती स्वीफ्ट कार क्रमांक डीएन 0९ ई २७४७ ने गेले. पत्नीला माहेरी सोडल्यानंतर अनिल आणि त्याचा भाऊ मनोज शिंदे देऊळगावराजाकडे परत येत असताना देऊळगावराजा- सिंदखेडराजा रोडवर काबरा जिनिंग फॅक्टरीजवळ त्यांची कार एका ट्रकवर आदळली. फॅक्टरीतील मजूर तसेच ढाब्यावरील लोक तातडीने त्यांच्या मदतीला धावून आले. दोघांवरही स्थानिक हॉस्पिटलमध्ये प्रथमोपचार करून, लगेच जालना येथे हलविण्यात आले. मनोज शिंदे याला जालना येथून औरंगाबाद येथे हलविण्यात आले; मात्र अनिलचा मृत्यू जालना येथे तर मनोजचा मृत्यू औरंगाबाद येथे झाला.

Web Title: One killed with Nawarda in an accident