महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 06:37 IST2025-05-10T06:36:55+5:302025-05-10T06:37:54+5:30

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा; राज्यभरात मॉक ड्रिल करणार, सायबर हल्ले राेखण्यासाठी ऑडिट करा

Officers' leaves cancelled; 'warroom' in every district | महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’

महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भारत-पाकिस्तान युद्धाचे ढग गडद होत असताना राज्यातील महत्त्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन आदी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 

 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या बैठकीत फडणवीस यांनी  पोलिस,  प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा व सज्जतेचा आढावा घेतला.  मॉकड्रिल, ब्लॅकआऊट आदींबाबत त्यांनी विविध सूचना केल्या. प्रत्येक जिल्ह्यात मॉक ड्रिल करा आणि जिल्हास्तरावर वॉर रूम स्थापित करा. केंद्र सरकारच्या ‘युनियन वॉर बुक’चे सखोल अध्ययन करीत त्याची सर्वांना माहिती  द्या, अशा सूचना फडणवीस यांनी केल्या. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील सर्व महापालिकांना ‘ब्लॅकआऊट’बाबत जागरूकता निर्माण करण्यास सांगा. यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांना सहभागी करून घ्या, असेही फडणवीस यांनी सांगितले.
सरकारच्या अतिमहत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर सायबर हल्ले होण्याची शक्यता लक्षात घेता सायबर विभागाकडून त्वरित सायबर ऑडिट करून घ्यावे. सरकार आणि सुरक्षा यंत्रणा यात अधिक समन्वयासाठी मुंबईतील सैन्याचे तिन्ही दल, तसेच कोस्टगार्डच्या प्रमुखांना पुढील बैठकीत निमंत्रित करा, अशी सूचना फडणवीस यांनी केली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,  पोलिस विभागाने नेहमीपेक्षा जास्त जागरूकता ठेवावी. देशद्रोही व्यक्तींच्या कारवाया वाढण्याची शक्यता पाहता अधिक कोम्बिंग ऑपरेशन करा व गस्त चोख ठेवा.

प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या सायबर सेलने समाजमाध्यमांवर देखरेख ठेवत पाकिस्तानला मदत करणारे हॅण्डल ओळखून त्यावर कारवाई करावी. शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कुणी प्रसारित करीत असेल तर त्यावर कारवाई करण्यात यावी.
सागरी सुरक्षा वाढविण्यासाठी फिशिंग ट्रॉलर्स भाड्याने घ्या. नागरिकांना अद्ययावत आणि खरी माहिती पोहोचविण्यासाठी सरकारकडून व्यवस्था उभी करा, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.  

सैन्यदलाच्या तयारीचे फोटो समाजमाध्यमांवर नको
सैन्य दल, तटरक्षक दलाकडून जी तयारी सुरू आहे त्याचे चित्रीकरण करून कुणीही समाजमाध्यमात व्हिडीओ टाकून प्रसारित करू नये, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ आपत्कालीन निधी 
ब्लॅकआऊटवेळी रुग्णालयासोबत समन्वय यंत्रणा उभी करा. पर्यायी विद्युत व्यवस्थेद्वारे यंत्रणा सुरू ठेवून, गडद रंगाचे पडदे अथवा गडद रंगाच्या काचा वापरून बाहेरून प्रकाश दिसणार नाही, अशी व्यवस्था करा, असे फडणवीस यांनी सांगितले. आजच प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना आपत्कालीन निधी देण्यात येणार असून, ज्यातून काही तातडीच्या साहित्याची खरेदी करायची असेल तर ती करता येईल. यासंदर्भात महत्वाचा प्रस्ताव आला तर तो एक तासात मंजूर करा, असे ते म्हणाले. 

Web Title: Officers' leaves cancelled; 'warroom' in every district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.