“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 19:40 IST2025-10-03T19:39:48+5:302025-10-03T19:40:12+5:30
Laxman Hake News: मनोज जरांगे यांना पाचवीत नेऊन बसवा म्हणजे त्यांना नागरिकशास्त्र कळेल, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली.

“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Laxman Hake News: महाराष्ट्रातील वातावरण मनोज जरांगे पाटील यांनी बिघडवले आहे. मनोज जरांगे यांच्यासारख्या नेता मिळाला, हे मराठ्यांचे दुर्दैव आहे. मनोज जरांगेंची भाषा लोकशाहीची नाही. कधीतरी त्यांनी विचाराचे उत्तर विचारांनी द्यावे. मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नाही. हे फक्त आम्ही म्हणत नाही तर हे आयोग म्हणत आहे, सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे, अनेक आयोग म्हणत आहेत, याचे उत्तर जरांगे यांच्याकडे नाही, अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली.
मनोज जरांगे पाटील यांची संस्कृती दिसून आली आहे. जरांगे यांना पाचवीत नेऊन बसवा म्हणजे त्यांना नागरिकशास्त्र कळेल आणि बाकी सगळे त्यांना लगेच लक्षात येईल, असा खोचक टोला हाके यांनी लगावला. ते माझ्याबाबत बोलताना तसेच टीका करताना म्हणतात की, कधी मी येवल्याचा माणूस आहे. कधी फडणवीस यांचा माणूस आहे, यांच्या डोक्याची मंडई झाली आहे, या शब्दांत हाके यांनी जरांगे यांच्या टीकेचा समाचार घेतला.
जरांगे हे बावळट माणूस आहेत, मूर्ख माणूस आहेत
सगळ्या समाज बांधवांनी ज्यांचे समान अडनाव आहे, त्यांनी नोंदी शोधण्यासाठी अर्ज करा, असे म्हटले होते. यावर बोलताना हाके म्हणाले की, आता मोरे हे आडनाव मराठा आहे, ओबीसी आहे, एससी आहे, मग जरांगे नेमके कोणत्या नावाला चॅलेंज करणार आहेत. या माणसाची लाज वाटते. न्यायमूर्ती पी व्ही सावंत कुठे, बीजी कोळसे पाटील कुठे, एनडी पाटील कुठे, आणि जरांगे कुठे, असा चिमटा काढताना जरांगे हे बावळट माणूस आहेत, मूर्ख माणूस आहेत महाराष्ट्राने यांच्या नादाला लागू नये, असे हाके यांनी म्हटले आहे.
दरम्यान, माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी झालेल्या दसरा मेळाव्यात मराठा आरक्षणावर बोलत त्यांना ओबीसीमधून नव्हे तर वेगळे आरक्षण द्या अशी मागणी केली होती. यामुळे मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंडे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा एकेरी उल्लेख करीत ते म्हणाले, तुला क्लिअर सांगतो. शहाणपणा करू नको, मी दादा (अजित पवार) मोजत नसतो. माझ्या नादी लागला तर तुझ्यासह अजित पवार यांचाही राजकीय करिअरचा देव्हारा करीन, असा थेट इशाराच जरांगे पाटील यांनी शुक्रवारी सकाळी येथे दिला.