“गेम करण्याएवढी ताकद नाही, आम्ही भांडी घासायला बसलोय का”; ओबीसी नेत्यांचे जरांगेंना उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 12:39 IST2025-10-07T12:39:29+5:302025-10-07T12:39:29+5:30
OBC Reservation Vs Maratha Reservation: अशा पद्धतीचे आरोप-प्रत्यारोप दोन्ही नेत्यांकडून थांबले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

“गेम करण्याएवढी ताकद नाही, आम्ही भांडी घासायला बसलोय का”; ओबीसी नेत्यांचे जरांगेंना उत्तर
OBC Reservation Vs Maratha Reservation: मागील दोन-तीन दिवसांमध्ये आमच्या आरक्षणावर सातत्याने बोलले जात आहे. आम्ही ओबीसींचा १९९४ चा शासन निर्णय चॅलेंज करू आणि ओबीसीचे आरक्षण संपवू. मनोज जरांगे पाटील यांचे हे विधान बालिशपणाचा आहे. कारण ओबीसी समाजाला मिळालेले आरक्षण खडतर परिश्रमानंतर मिळाले आहे. १९९४ ला मंडल आयोगाचा अहवाल आला आणि सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर २७ टक्के आरक्षण मिळाले. परंतु, आता वारंवार दहशत निर्माण करण्याचे काम सुरू आहे, अशी टीका ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी केली.
पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, मनोज जरांगे पाटील रोज काहीतरी वक्तव्य करत असतात. संपूर्ण महाराष्ट्र त्यांनाच कळतो, अशा पद्धतीने ते वागत असतात. आंदोलन करता म्हणून त्यांच्या पाठीमागे जनता आहे. फक्त त्यांना खुश करण्यासाठी इतर समाजाला बदनाम करण्याचे काम ते करत असतात. राजकारणात कोणी कोणाला संपवत नाही. प्रत्येक व्यक्ती आपापल्या ताकदीने उभा राहत असतो, असे तायवाडे यांनी म्हटले आहे.
गेम करण्याएवढी ताकद नाही, आम्ही भांडी घासायला बसलोय का
कोणी कोणाचा गेम करेल, एवढी ताकद नाही, आम्ही काय भांडी घासायला बसलेलो नाही. आमच्या नेत्यांमध्येही मोठी ताकद आहे. साडेचारशे जातींचा समूह आहे. मतभेद असले, तरी मनभेद नाहीत. आम्ही कोणत्याही ओबीसी नेत्याला संपू देणार नाही. आम्ही सगळे त्यांच्यासोबत आणि पाठीशी उभे राहू. परंतु, अशा पद्धतीचे आरोप-प्रत्यारोप दोन्ही नेत्यांकडून थांबले पाहिजे आणि दुफळी निर्माण झाली ती कुठेतरी थांबली पाहिजे, असे मत तायवाडे यांनी मांडले.
दरम्यान, मनोज जरांगेनी सत्तेतील सर्वच नेत्यांवर टीका केली आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे वक्तव्य करून लक्ष केंद्रित करण्याचा काम करणे, हा त्यांचा नेहमीचा स्वभाव झालेला आहे. २ सप्टेंबरच्या जीआरमुळे आरक्षणाला धक्का लागला नाही, असे तायवाडे म्हणाले.