आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 05:39 IST2025-09-29T05:38:50+5:302025-09-29T05:39:58+5:30
मराठवाडा व राज्याच्या विविध भागात झालेल्या अतिवृष्टीने शेतशिवारं खरडून निघाली. पिकांसह माती वाहून गेल्याने सुपीक जमिनीला नदी - नाल्यांचे स्वरुप आले आहे.

आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
महेश घोराळे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मराठवाडा व राज्याच्या विविध भागात झालेल्या अतिवृष्टीने शेतशिवारं खरडून निघाली. पिकांसह माती वाहून गेल्याने सुपीक जमिनीला नदी - नाल्यांचे स्वरुप आले आहे. जिथे पिकं होती तिथे दगड-गोटे आणि वाळूचा थर पसरला. मातीचा पोषक थरच वाहून गेल्याने पुन्हा सुपीक माती तयार होण्यास तीन वर्षे शेतकऱ्यांना कष्ट घ्यावे लागतील.
नुकसान : शेतातील माती वाहून गेल्याचे परिणाम
> पोषण कमी, उत्पादन घटेल.
> जलधारण क्षमता कमी होईल व पिकांना पाणी कमी मिळेल.
>वाळूच्या थरामुळे पिकांची वाढ कमी होऊ शकते.
पुढे काय ? सुपीक थर पुन्हा तयार करावा लागेल
>कंपोस्ट, शेणखत वापर वाढवा.
> मूग, हरभरा अशी मातीचा बचाव करणारी पिके घ्यावी लागतील.
> मातीनुसार पीक निवड, पिकात फेरबदल करावे लागतील.
माती वाहून जाणे किंवा गाळ झालेल्या जमिनीची सुपीकता पूर्ववत आणण्यासाठी पुढील काही वर्षे शेतकऱ्यांना मृदा संवर्धानाची कामे हाती घ्यावी लागतील.
डॉ. संजय भोयर, प्राध्यापक, मृदविज्ञान, डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला
पुरामुळे मातीबरोबर अन्नद्रव्यांचा मोठा ऱ्हास झाला आहे. सुपीकता गेल्याने उत्पादकतेवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकताे. त्यामुळे सातत्यपूर्ण उपयांची गरज आहे.
डॉ. हरिहर कौसडीकर, विभागप्रमुख, मृदविज्ञान विभाग, व. ना. म. कृ. वि., परभणी
आता उत्पादन खर्च वाढेल
मृदविज्ञान अभ्यासकांच्या मते, पुढील ३ ते ४ हंगामात कडक जमिनीत पेरणी कशी करावी अन् उत्पादन कसे घ्यावे, हा प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे असणार आहे. मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात यंदा महापुराने मातीची धूप झाल्याने सेंद्रिय कर्ब आणि इतर पोषक घटकांचा थर नाहीसा झाला. पुढील काही वर्षे याचा गंभीर परिणाम होऊन उत्पादनात घट होऊ शकते. मृद संधारण व धूप प्रतिबंधक उपायांसाठीच्या अतिरिक्त खर्च करावा लागेल.