आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 06:24 IST2025-09-30T06:23:47+5:302025-09-30T06:24:04+5:30
विद्यार्थी प्रत्यक्षात शाळेत हजर तर ऑनलाइन गैरहजर अशी परिस्थिती राज्यभरातील शाळांमध्ये होती. परंतु, आता विद्यार्थी ऑनलाइनही हजर दिसणार आहेत.

आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
मुंबई : विद्यार्थी प्रत्यक्षात शाळेत हजर तर ऑनलाइन गैरहजर अशी परिस्थिती राज्यभरातील शाळांमध्ये होती. परंतु, आता विद्यार्थी ऑनलाइनही हजर दिसणार आहेत. राज्यातील दुसरी ते बारावीपर्यंतच्या नवीन विद्यार्थ्यांच्या यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आणि स्वतंत्र पर्याय (टॅब ) शाळांना उपलब्ध झाला आहे. मात्र १५ सप्टेंबर २०२५ रोजी केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाने मुदतवाढीचे आदेश दिल्यानंतर २९ सप्टेंबरपर्यंत तब्बल १४ दिवसांनी शिक्षण विभागाने ते जाहीर करण्याची वाट का पाहिली, असा सवालही शिक्षक मुख्याध्यापकांनी केला आहे.
परराज्यातील आणि राज्यातील नवीन विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी केंद्र शासनाने शिक्षण विभागाला मुदतवाढ दिली आहे.
महेश पालकर, संचालक, शिक्षण विभाग
१५ सप्टेंबर २०२५ रोजी केंद्र शासनाच्या शिक्षण विभागाने मुदत वाढीबाबत स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र, २९ तारखेपर्यंत ही गोष्ट का लपवली ते स्पष्ट होत नाही.
महेंद्र गणपुले, माजी अध्यक्ष, मुख्याध्यापक संघटना
मंगळवार, ३० सप्टेंबरची अखेरची मुदत होती
प्रवेशासाठी मुदतवाढ दिल्यामुळे राज्यातील लाखो शाळांना आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे विद्यार्थी शाळाबाह्य होण्यापासून वाचतील, अशी प्रतिक्रिया शिक्षक भारती संघटनेचे सुभाष मोरे आणि पुरोगामी शिक्षक संघटनेचे संजय केवटे यांनी दिली आहे. नवीन प्रवेश नोंदणीबाबत स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देण्याबाबत २५ सप्टेंबर २०२५ रोजीच केंद्र सरकारच्या सांख्यिकी विभागाच्या उपसंचालकांना महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे संचालक संजय यादव यांनी स्पष्टपणे पत्र लिहून विनंती केली होती.