नाही कसे... समाजाचे, देशाचे नेतृत्व करणाऱ्यांना प्रश्न विचारलेच पाहिजेत! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 13:20 IST2026-01-01T13:20:21+5:302026-01-01T13:20:59+5:30
सध्याच्या सामाजिक - राजकीय - सांस्कृतिक वर्तमानात साहित्य संमेलनाची भूमिका काय? वैचारिक दिशा देऊ शकतात का ही संमेलनं, की ती फक्त इव्हेंटपुरती मर्यादित राहतात?

नाही कसे... समाजाचे, देशाचे नेतृत्व करणाऱ्यांना प्रश्न विचारलेच पाहिजेत! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
दुर्गेश सोनार -
९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारताना कोणती जबाबदारी सर्वाधिक जाणवते?
पाटील : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला एक प्रकारचं वेगळं महत्त्व आहे. ही वर्षातून एकदा भरणारी शब्दांची पंढरी आहे. सेवाभावानं मराठीची सेवा करायला मिळतेय, याचा मला आनंद आहे.
सध्याच्या सामाजिक - राजकीय - सांस्कृतिक वर्तमानात साहित्य संमेलनाची भूमिका काय? वैचारिक दिशा देऊ शकतात का ही संमेलनं, की ती फक्त इव्हेंटपुरती मर्यादित राहतात?
पाटील : इव्हेंटची घुसखोरी मलाही फारशी आवडत नाही. साहित्य संमेलनात रात्री इतके मनोरंजनाचे कार्यक्रम असतात, की दिवसा लोक संमेलनाकडे फिरकतच नाहीत. याला काही अर्थ नाही. दुधामध्ये साखर घाला, साखरेमध्ये दूध ओतू नका; इतके मी नक्की सांगेन. मराठी साहित्य संमेलनाचे काम आणि उद्दिष्ट विचाराला दिशा देणे हे आहे. तो उद्देश सफल झाला पाहिजे.
ऐतिहासिक कादंबरी हा तुमचा प्रांत. या लेखनात सत्य, वस्तुनिष्ठता आणि साहित्यिक स्वातंत्र्य यांचा तोल कसा साधावा?
पाटील : ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय… असा काही फरक नसतो. प्रत्येक गोष्ट ही माणसाची गोष्ट असते. मग ती त्याच्या लढाईची असेल, संघर्षाची असेल, दुःख, खेद, हर्ष यांची असेल… ही त्या त्या व्यक्तिरेखेशी तादात्म्य पावून किंवा त्या प्रसंगांशी एकरूप होऊन मांडता येते. ग्रंथालयांच्या वर्गवारीसाठी ऐतिहासिक, सामाजिक असे भाग असावेत. पण, मला ऐतिहासिक आणि ग्रामीण किंवा सामाजिक… हा फरकच वाटत नाही.
ज्यावेळेला मी ‘झाडाझडती’ लिहितो, त्या वेळेला धरणांचा अभ्यास, धरणग्रस्तांच्या लढ्यांचा अभ्यास महत्त्वाचा! ‘लस्ट फॉर मुंबई…’ या कादंबरीसाठी मुंबईच्या कामगार चळवळी, त्याच्या नंतर हिंसाजनक आंदोलने, टोळीयुध्दे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला. कुठलंही काम जबाबदारीनं करताना आणि ते उठून दिसावं, लोकांना जिवंत वाटावं किंवा ते वाङ्मयीनदृष्ट्याही आपल्या फॉर्मच्या ताकदीनं उभं राहावं, असं वाटत असेल तर अभ्यासाला पर्याय नसतो, संशोधनाला पर्याय नसतो… मग ते ग्रामीण लेखक असोत नाही तर ऐतिहासिक असोत!
आजचं मराठी साहित्य तुम्हाला अधिक प्रयोगशील वाटतं की वैचारिक गोंधळलेलं?
पाटील : असं काही म्हणता येणार नाही. प्रत्येक जण आपापल्या प्रकृतीप्रमाणे लिहित राहतो. काही प्रयोगशील असतात, काही चाकोरीतून जाणारे असतात. पण एक नक्की. जीवनामध्ये उलथापालथी होतात, मोठी अरिष्टं येतात किंवा समाजामध्ये घालमेल चालू असते, असा काळ नाटक आणि कादंबरीला खूप पोषक असतो. तसं महाराष्ट्राचं वातावरण आहे सध्या. पण, त्या मानाने इथले कादंबरीकार आणि नाटककार तेवढ्या धाडसानं पुढे येताना दिसत नाहीत.
सोशल मीडियाच्या प्रभावामुळे लेखक आणि वाचक या नात्यामध्ये काही बदल झाला आहे असं वाटतं का?
पाटील : सोशल मीडिया साहित्याच्या तोंडओळखीपुरता पुरेसा असतो. सोशल मीडियावर तुम्ही कळवू शकता की, नवीन सिनेमा आला, नवीन पुस्तक आलं… पण, सखोल संशोधन, सखोल दृष्टी किंवा परिपूर्ण अभ्यास ही मानवी मनाची भूक सोशल मीडिया अजिबात भागवू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला ग्रंथांच्याच गावाला जायला हवं... शिवाय सोशल मीडियावर बुद्धिभेदाचा धोका मोठा. जी सखोलता पाहिजे ती नाही सोशल मीडियामध्ये.
लेखकाने राजकीय भूमिका घ्यावी का, की अलिप्त असावं?
पाटील : राजकीय भूमिका घ्यायची किंवा नाही, हे ज्याच्या-त्याच्या प्रकृतीधर्मावर अवलंबून असतं… पण, लेखकाने भूमिका घ्यावी एवढं नक्की. मग ती राजकारण्यांसाठीच पाहिजे, चळवळीसाठीच पाहिजे असं नाही. पण, आपली एखादी भूमिका असावी!
व्यवस्थेला जेव्हा प्रश्न विचारतात साहित्यिक तेव्हा त्यांच्यावर एखाद्या विशिष्ट विचारधारेचा ठपका ठेवला जातो, कधी या बाजूचे, कधी त्या बाजूचे… मग प्रश्न विचारूच नयेत का?
पाटील : प्रश्न विचारलेच पाहिजेत नां… समजा, आपण मोटारीने निघालो तर आपण ड्रायव्हरला विचारतोच ना; की बाबा, कुठे घेऊन चालला आहेस? जे समाजाचं आणि देशाचं नेतृत्व करतात, त्यांना अधनंमधनं प्रश्न विचारलेच पाहिजेत! रोखलं पाहिजे असं नव्हे. पण, प्रश्न विचारण्याचा चौकसपणा तर दाखवलाच पाहिजे नां?