राज ठाकरेंना मोठा दिलासा! १६ वर्षांपूर्वीचा खटला रद्द, पुरावा नसल्याचे हायकोर्टाचे निरीक्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 16:38 IST2024-04-22T16:38:35+5:302024-04-22T16:38:42+5:30
MNS Raj Thackeray News: राज ठाकरेंवरील आरोप निराधार असून, पुरावे नसल्याचे निरीक्षण नोंदवत हायकोर्टाने खटला रद्द केल्याचे सांगितले जात आहे.

राज ठाकरेंना मोठा दिलासा! १६ वर्षांपूर्वीचा खटला रद्द, पुरावा नसल्याचे हायकोर्टाचे निरीक्षण
MNS Raj Thackeray News: एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर मनसेचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते कामाला लागले आहेत. तर दुसरीकडे १६ वर्षे जुन्या खटल्यातून राज ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाल्याचे वृत्त आहे. राज ठाकरे यांच्यावरील आरोप निराधार असल्याचे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नोंदवले आहे.
१६ वर्षे जुन्या खटल्यातील दोषमुक्तीचा अर्ज फेटाळणाऱ्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला राज ठाकरे यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले होते. या आव्हान याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. काही महत्त्वाच्या बाबींची नोंद घेण्यात कनिष्ठ न्यायालय अपयशी ठरले आहे आणि राज ठाकरे यांनी या खटल्यातून दोषमुक्त करावे, यासाठी केलेली विनंती नाकारण्यात चूक केली आहे, असे खंडपीठाने म्हटले आहे.
२१ ऑक्टोबर २००८ रोजी तत्कालीन उस्मानाबाद आताचे धाराशीव जिल्ह्यात मनसे कार्यकर्त्यांवर एसटीच्या बसवर दगडफेक केल्याचा आरोप करण्यात आला होता. मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. सन २००८ मध्ये बिहार आणि उत्तर प्रदेशातील परप्रांतीय कामगारांनी महाराष्ट्रातील लोकांच्या नोकऱ्या हिरावल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. मुंबईत रेल्वे प्रवेश परीक्षेला बसलेल्या काही उत्तर भारतीय उमेदवारांना मारहाण करणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना चिथावणी दिल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात आरोपपत्रही दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, या प्रकरणातील दोषमुक्तीसाठी राज ठाकरे यांनी याचिका दाखल केली होती. कनिष्ठ न्यायालयाने ती फेटाळून लावली. राज ठाकरे यांची बाजू मांडणारे वकील राजेंद्र शिरोडकर आणि सयाजी नांगरे यांनी, ही कथित घटना घडली तेव्हा नेते घटनास्थळी नव्हते, अशी भूमिका मांडली. राज ठाकरे यांचे कथित प्रक्षोभक भाषण फिर्यादीने रेकॉर्डवर ठेवलेले नाही. आरोपपत्रातही ते जोडलेले नाही. त्यामुळे प्रक्षोभक भाषण केले असे म्हणता येणार नाही, असे न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिले. सर्व साक्षी, पुरावे पाहिल्यानंतर खंडपीठाने राज ठाकरे यांच्या कथित चिथावणीखोर भाषण आणि चिथावणी देण्याबाबत कोणताही पुरावा नसल्याचे निरीक्षण नोंदवत खटला रद्द केल्याची माहिती देण्यात आली आहे.