'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 13:56 IST2025-07-01T13:54:46+5:302025-07-01T13:56:55+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाला उत्तर देताना आर्थिक फसवणुकीच्या घटनाबद्दल माहिती दिली. पोलिसांकडून केल्या जात असलेल्या कारवाईबद्दलही त्यांनी विधानसभेत माहिती दिली.

'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
CM Devendra Fadnavis News: राज्यात उघडकीस आलेल्या टोरेस घोटाळ्यासंदर्भात विधानसभेत प्रश्न विचारण्यात आला. अशा प्रकारच्या आर्थिक फसवणुकीच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. याबद्दल बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केले. पोलिसांकडून केल्या जात असलेल्या उपाययोजनांबद्दलही मुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती दिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "अशा प्रकारची आमिषे दाखवणाऱ्या कंपन्या, आकर्षक परतावा देण्याच्या योजना चालवणाऱ्या कंपन्या याच्यामध्ये गुंतवणूक करू नका अशी मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे. जाहिराती पण दिल्या आहेत. त्यासंदर्भात जनजागृतीची मोहिमही हाती घेण्यात आली आहे. अर्थात अशी कंपनी सुरू झाल्याबरोबर पोलिसांना कारवाई करण्याचा मार्ग नाहीये. कारण अशी कंपनी सुरू करण्यासाठी कंपनी अधिनियमाच्या अंतर्गत नोंदणी करावी लागते. पोलिसांची परवानगी घ्यावी लागत नाही."
...नंतर गाशा गुंडाळून गायब होतात -फडणवीस
"आपण आर्थिक गुप्तचर शाखाही सुरू केली आहे. कंपन्यांनी अधिकचा नफा देणाऱ्या जाहिराती दिल्या. तर त्या आधारावर कारवाई आपण करतो आहे. पण, यामध्ये व्यापक जनजागृती हाच एक महत्त्वाचा विषय आहे. कारण अनेकवेळा अशा घटना घडलेल्या आहेत की, या कंपन्या नोंदणीकृतही नसतात. कुणाची परवानगी नसते. थेट बोर्ड लावतात. लोकांकडून पैसे घेतात. पहिले दोन-तीन महिने व्याज सांगितलेलं असतं, तसं परत करतात. नंतर सगळा गाशा गुंडाळून गायब होतात", असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
वाचा >>आवाज मराठीचा...! आम्ही फक्त आयोजक, जल्लोष तुम्ही करायचंय; राज-उद्धव यांचं एकत्रित आवाहन
"मी या सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला विनंती करतो की, कुणीही तुम्हाला अधिकचं व्याजदर देण्याची हमी देत असेल किंवा तशी योजना आणत असेल, तर विश्वास ठेवू नका. त्यांच्याकडे सगळ्या परवानग्या आहे की, नाही बघा. ते कशाच्या आधारावर देणार आहेत? कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या फसवणुकीच्या संदर्भात लोकांनी जागरूक राहिले पाहिजे. पोलिसही जास्तीत जास्त जाणीव जागृतीचा कार्यक्रम हाती घेतील", अशी माहिती फडणवीस यांनी विधानसभेत दिली.