उसन्या बळावर कोणी जंगलाचा राजा बनत नाही; फडणवीसांचा ठाकरे, पवारांवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 19:44 IST2023-05-18T19:25:12+5:302023-05-18T19:44:11+5:30
Devendra Fadanvis Speech: भाजपाच्या कार्यकारीणीच्या बैठकीत फडणवीस यांनी पवारांच्या राजीनाम्यावर तसेच पुस्तकावर टीका केली आहे.

उसन्या बळावर कोणी जंगलाचा राजा बनत नाही; फडणवीसांचा ठाकरे, पवारांवर हल्लाबोल
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टोलेबाजी केली आहे. भाजपाच्या कार्यकारीणीच्या बैठकीत त्यांनी पवारांच्या राजीनाम्यावर तसेच पुस्तकावर टीका केली आहे. पवार यांनी राजीनामा देतो म्हणणे आणि देणे याचे उत्तम उदाहरण ठाकरेंना दिल्याचे ते म्हणाले.
राज्यात टीआरपी कसा मिळवायचा याचे प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. शरद पवारांनी मीच माझा राजीनामा माझ्या पक्षाकडे देतो, त्यानंतर पक्ष राजीनाम्यावर आक्रोश तयार करेल, त्यावर ठराव घेईल आणि मीच परत राजीनामा मागे घेऊन आपल्या स्थानावर येईन असा गोंधळ घातला होता, अशी टीका फडणवीस यांनी केली. एकप्रकारे पवारांनी ठाकरेंना उदाहरण दिल्याचे फडणवीस म्हणाले.
शरद पवारांच्या भाकरी फिरविण्याची वेळ आली या वक्तव्याचाही फडणवीस यांनी समाचार घेतला. सध्या सगळीकडे भाकरी फिरवण्याची चर्चा आहे. आम्ही भाकरी फिरवत नाही गरिबांच्या भाकरीची चिंता करतो. एक पक्ष भाकरी फिरवतोय, तर दुसरा भाकरीचे तुकडे करतोय आणि तिसरा ते हिसकावून घेतोय अशी स्थिती मविआमध्ये आहे. फक्त भाजपाच गरीबांच्या भाकरीची चिंता करत असल्याचे फडणवीस म्हणाले. फडणवीसांनी शरद पवारांच्या पुस्तकातील ठाकरेंबद्दलचा उल्लेख वाचून दाखविला तसेच आमचे आरोप खरे होते, असे ते म्हणाले.
गावोगावी जा आणि सांगा आपलाच विजय झालाय, असे उद्धव ठाकरे सांगत आहेत. बडवा, आपल्या बापाचं काय जातंय. पण तुमच्या मनात कोणतीही शंका ठेवू नका, पोपट मेला आहे. हे सरकार पूर्णपणे संविधानिक, पूर्णपणे नैतिक आहे,' असे फडणवीसांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.
उसनं बळ घेऊन वाघ बनता येत नाही. वाघ कधी कधी बनताही येतं, एक सर्कशीतला वाघ असतो आणि एक जंगलाचा राजा असतो. जंगलाचा राजा बनायचं असेल तर स्वत:चं बळ लागतं, उसन्या बळावर कोणी जंगलाचा राजा बनत नाही, असा टोला फडणवीसांनी ठाकरेंना लगावला.