"कपड्यांचा रंग निळा असल्याने कुणी आंबेडकरवादी होत नाही’’, नारायण राणेंचा राहुल गांधींना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 19:58 IST2024-12-23T19:58:01+5:302024-12-23T19:58:43+5:30
Narayan Rane Criticize Rahul Gandhi: राहुल गांधी यांना अद्याप महाराष्ट्र कळलेला नाही. राहल गांधी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर तरी कळले आहेत का? कपड्यांचा रंग निळा असला म्हणजे कुणी आंबेडकरवारी होत नाही. त्यासाठी कपड्यांच्या आत काही तरी असावं लागतं असा टोला नारायण राणे यांनी लगावला.

"कपड्यांचा रंग निळा असल्याने कुणी आंबेडकरवादी होत नाही’’, नारायण राणेंचा राहुल गांधींना टोला
काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज परभणीचा दौरा करत मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीनंतर राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी पोलीस आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. सोमनाथ सूर्यवंशी दलित असल्याने पोलिसांनी त्याची हत्या केली. याबद्दल मुख्यमंत्र्यांनी खोटे निवेदन विधानसभेत दिले, असा दावा राहुल गांधी यांनी केला. त्यानंतर भाजपामधून तिखट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. भाजपा खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनीही राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. कपड्यांचा रंग निळा असल्याने कुणी आंबेडकरवारी होत नाही, असा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे.
राहुल गांधींवर टीका करताना नारायण राणे म्हणाले की, राहुल गांधी यांना अद्याप महाराष्ट्र कळलेला नाही. राहल गांधी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर तरी कळले आहेत का? कपड्यांचा रंग निळा असला म्हणजे कुणी आंबेडकरवारी होत नाही. त्यासाठी कपड्यांच्या आत काही तरी असावं लागतं असा टोला नारायण राणे यांनी लगावला.
दरम्यान, परभणीच्या दौऱ्यात पोलीस आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले होते की, "मी आज सूर्यवंशींच्या कुटुंबीयांना भेटलोय. ज्या लोकांना मारहाण झाली, त्यांनाही भेटलो. त्यांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट दाखविला. व्हिडीओ दाखवला. छायाचित्रे दाखवली. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हा शंभर टक्के कोठडीत झालेला मृत्यू आहे. पोलिसांनी त्यांची हत्या केली आहे आणि मुख्यमंत्री पोलिसांना मेसेज देण्यासाठी विधानसभेत खोटं बोलले", असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला.