No matter how many crises come, I will stand on my feet! These words of Lokmanya are inspiring in Corona period: Subodh Bhave | कितीही संकटे आली तरी त्यावर पाय रोवून उभा राहीन! लोकमान्यांचे हे बोल कोरोना काळात प्रेरणादायी: सुबोध भावे

कितीही संकटे आली तरी त्यावर पाय रोवून उभा राहीन! लोकमान्यांचे हे बोल कोरोना काळात प्रेरणादायी: सुबोध भावे

ठळक मुद्देसमर्थ युवा फाैऊडेशन यांच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे आणि राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचा सन्मान

पुणे : "कितीही संकटे आली, आभाळ जरी कोसळले तरी त्यावर पाय रोवून उभा राहीन" हे लोकमान्य टिळकांचे परखड बोल आज कोरोनाच्या संकट काळात प्रकर्षाने आठवतात. सध्या कोरोनामुळे अत्यन्त बिकट स्थिती निर्माण झाली आहे. अनेक गोष्टी कानावर आदळत आहेत.  पण त्यांचे हे बोल कायम स्मरणात ठेवल्यास संकटावर मात करण्यास निश्चितच बळ मिळेल, असा आशावाद प्रसिद्ध अभिनेते- दिग्दर्शक सुबोध भावे यांनी व्यक्त केला.
       लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृति शताब्दीवर्षाच्या  सांगता समारंभानिमित्त शनिवारी  ( 1 ऑगस्ट)  संवाद पुणे आणि समर्थ युवा फाैऊडेशन यांच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे आणि राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचा खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यानंतर 'मी आणि लोकमान्य' या कार्यक्रमात अनुभव कथन करताना सुबोध भावे बोलत होते. मिलिंद कुलकर्णी यांनी संवादकाची चोख भूमिका बजावली.


   पुरस्कार सोहळ्याप्रसंगी भाजपा शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार सुनिल कांबळे,  पुणे मनपाचे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, समर्थ युवा फाैऊडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन,  सचिन ईटकर उपस्थित होते.
    भावे म्हणाले, लोकमान्यांनी केवळ गणेश उत्सवाद्वारे लोकांना एकत्र आणले नाही तर त्यांनी अनेक छोट्या कार्यांतून लोकांच्या मनातील स्वांतत्र्य लढ्याबाबतची आग धुमसत ठेवली. लोकमान्य हे ज्योतिष शास्त्राचे गाढे अभ्यासक होते, तसेच ते गणिततज्ज्ञ म्हणून देखील प्रसिद्ध होते. त्यामुळे त्यांच्या मनात स्वातंत्र्य प्राप्तीचा रोड मॅप तयार होता. त्या रोड मॅप नुसारच त्यांची पाऊले उचलली जात होती आणि कोण, कुठे,कोणती भूमिका निभावणार हे त्यांच्या गणितीय बुद्धीतून स्पष्ट होते. चित्रपटाच्या निमित्ताने टिळकांच्या चरित्रावर प्रकाशझोत टाकणारी अनेक पुस्तकं वाचनात आली. त्यात गंगाधर गाडगीळ यांनी लिहिलेले दुर्दम्य, सदानंद मोरे यांनी लिहिलेले लोकमान्य ते महात्मा हा द्विखंड, न.चिं केळकर यांनी लिहिलेले पुस्तक अशा अनेक पुस्तकांचा माझ्यावर प्रभाव होता. ही पुस्तके वाचून मला उमगले की, शाळेत शिकविले जातात त्यापेक्षा टिळक खूप वेगळे आहेत.गणेश उत्सवाचे आद्य प्रवर्तक केवळ या प्रतिमेतच आपण लोकमान्यांना अडकवले आणि त्यातच त्यांच्या प्रतिमेचे विसर्जन केले. लोकमान्यांचे कर्तृत्व आणि ध्येयवाद यापेक्षा खूप व्यापक होता, तो आपण समजून घेतला तरच आपण लोकमान्यांना ओळखले असे म्हणू शकू याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
     सध्या कोरोना काळात कलाकारांवर आर्थिक आरिष्टय कोसळले आहे.पण मी ज्या गोष्टीवर श्रद्धा ठेवून आलोय ते पावित्र्य श्रद्धा मला घालवू द्यायची नाहीये, हवं ते काम करता आले नाहीतर काय? असं मला नकोय हे  त्यांनी प्रांजळपणे सांगितले. कोणताही कलाकार कोरी पाटी घेऊन जन्माला येतो ती पाटी भूमिका झाली की नेहमी कोरी करतो
त्यानंतरच त्यावर नवीन लिहिता येते. माझ्या भूमिकांमधून खूप काही शिकत गेलो पण त्याने आयुष्य व्यापून टाकता कामा नये. हे तत्व नेहमी पाळले असेही त्यांनी सांगितले.
   कार्यक्रमानंर कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे 'लोकमान्यांचे तेजस्वी जीवन' या विषयावर कीर्तन  झाले. 
.......

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: No matter how many crises come, I will stand on my feet! These words of Lokmanya are inspiring in Corona period: Subodh Bhave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.