Pharmacy Colleges: फार्मसी कॉलेजांना 'नो ॲडमिशन'! प्रवेशाविना १५ हजारांहून अधिक जागा रिकाम्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 14:11 IST2025-11-20T14:10:40+5:302025-11-20T14:11:43+5:30
राज्यात गेल्या काही वर्षांत बी. फार्मसी अभ्यासक्रमाच्या कॉलेजांमध्ये भरमसाठ वाढ झाल्याने रिक्त जागांचे प्रमाणही वाढले आहे.

Pharmacy Colleges: फार्मसी कॉलेजांना 'नो ॲडमिशन'! प्रवेशाविना १५ हजारांहून अधिक जागा रिकाम्या
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात गेल्या काही वर्षांत बी. फार्मसी अभ्यासक्रमाच्या कॉलेजांमध्ये भरमसाठ वाढ झाल्याने रिक्त जागांचे प्रमाणही वाढले आहे. यंदा बी.फार्मसी अभ्यासक्रमाच्या ३३ टक्के जागा रिक्त राहिल्या असून, १५,९३६ जागांवर प्रवेश झाले नसल्याची स्थिती आहे. अनेक कॉलेजांतील निम्म्या जागा भरल्या गेलेल्या नाहीत. तसेच गेल्यावर्षीच्या तुलनेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही घट झाली आहे.
राज्य सामाईक प्रवेशपरीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) बी. फार्मसी अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया राबविली जाते. यंदा बी. फार्मसीच्या ५३१ कॉलेजांमध्ये ४८,८७८ जागा होत्या. त्यांपैकी ३२,९४२ जागा भरल्या आहेत. गेल्या वर्षी फार्मसीची ६१ नवी कॉलेजेस सुरू झाली होती. त्यामुळे कॉलेजांची संख्या ५१४ झाली होती. गेल्यावर्षी प्रवेशासाठी ४८,०५१ जागा होत्या. त्यांपैकी ३१,८२७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता आणि १६,२२४ जागा रिक्त राहिल्या होत्या.
विद्यार्थ्यांअभावी कॉलेजे ओस
दरवर्षी कॉलेजांची संख्या वाढत असल्याने रिक्त जागांची संख्या वाढत आहे. विद्यार्थ्यांअभावी अनेक कॉलेजेस ओस पडली आहेत. वर्गात विद्यार्थीच नसल्याने कॉलेजांना अभ्यासक्रम चालविणे जिकिरीचे झाले आहे. तसेच पायाभूत सुविधा आणि गुणवत्तापूर्ण प्राध्यापकांची कमतरता असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.