कॅम्पा कोलावर आजही कारवाई नाहीच, रहिवाशांवर गुन्हे दाखल

By Admin | Updated: June 21, 2014 15:54 IST2014-06-21T14:45:37+5:302014-06-21T15:54:37+5:30

मुंबईतील कॅम्पा कोला या इमारतीतील बेकायदेशीर मजल्यांवर कारवाई करण्यात मुंबई महापालिकेला सलग दुस-या दिवशी अपयश आले.

No action is still taken on Campa Cola, residents have filed criminal cases | कॅम्पा कोलावर आजही कारवाई नाहीच, रहिवाशांवर गुन्हे दाखल

कॅम्पा कोलावर आजही कारवाई नाहीच, रहिवाशांवर गुन्हे दाखल

 

ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २१- मुंबईतील कॅम्पा कोला या इमारतीतील बेकायदेशीर मजल्यांवर कारवाई करण्यात मुंबई महापालिकेला सलग दुस-या दिवशी  अपयश आले. शनिवारी सकाळी महापालिकेचे पथक कॅम्पाकोलात दाखल झाले मात्र रहिवाशांच्या तीव्र विरोधामुळे त्यांना कारवाई करता आली नाही व अखेर पथक माघारी फिरले. दरम्यान, महापालिकेने कॅम्पाकोलातील रहिवाशांविरोधात सुप्रीम कोर्टाचा अवमान व सरकारी कामाता हस्तक्षेप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 
कॅम्पा कोला इमारतीतील १०२ बेकायदेशीर घरांवर कारवाईचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. यानुसार शुक्रवारपासून महापालिका या घरांमधील वीज, पाणी व गॅस कनेक्शन तोडण्याची कारवाई करणार होती. शुक्रवारी रहिवाशांच्या विरोधामुळे कारवाई टळली होती. शनिवारी सलग दुस-या दिवशी महापालिकेचे पथक कॅम्पाकोलात कारवाईसाठी दाखल झाले. रहिवाशांनी पुन्हा एकदा प्रवेशद्वारावरच महापालिकेच्या अधिका-यांना रोखून ठेवले. अधिका-यांनी बराच वेळ रहिवाशांशी चर्चा केली मात्र रहिवासी त्यांच्या भूमिकेवर ठाम होते. दुपारी दोनच्या सुमारास महापालिकेच्या अधिका-यांनी कॅम्पाकोलातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. 
दरम्यान, शुक्रवारी रात्री उशीरा महापालिकेने कॅम्पा कोलातील रहिवाशांविरोधात वरळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अवमान करणे, सरकारी कामात हस्तक्षेप अशा विविध कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेने रहिवाशांच्या विरोधाची व्हिडीओ टेपही पोलिसांना पुरावा म्हणून सादर केली आहे. ही टेप तपासल्यानंतर संबंधितांवर कठोर कारवाई करु असे वरळी पोलिसांनी सांगितले.
 

Web Title: No action is still taken on Campa Cola, residents have filed criminal cases