सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 18:24 IST2025-06-17T18:23:34+5:302025-06-17T18:24:27+5:30
बडगुजर उद्धवसेनेत असताना भाजपा नेते नितेश राणे यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप लावले होते.

सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
मुंबई - नाशिकमधील उद्धव ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाने त्यांच्यावर आरोप करणाऱ्या भाजपा नेत्यांची चांगलीच गोची झाल्याचे दिसून आले. गिरीश महाजन यांनी नाशिकमधील हा पक्षप्रवेश घडवून आणला. परंतु या पक्षप्रवेशाला स्थानिक भाजपा आमदारांनी विरोध केल्याचे दिसून आले होते. त्यातच आज बडगुजर यांचा पक्षात प्रवेश होताच मंत्री नितेश राणे यांचेही सूर बदलल्याचे दिसून आले.
मंत्री नितेश राणे म्हणाले की, सुधाकर बडगुजर यांचा हल्लीचा प्रवास हिंदुत्वाच्या दिशेने फार जोमाने सुरू आहे. नाशिकमधील हिंदू सकल मोर्चात आमच्या खांद्याला खांदा लावून त्यांचा मुलगा हिंदुत्वाचा आवाज पुढे नेत होता. त्यामुळे जर हिंदुत्व भक्कम होत असेल आणि हिंदुत्वासाठी आमच्या खांद्याला खांदा लावून काम करायला कुणी तयार असेल तर कोणाला आक्षेप घेण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
पक्षप्रवेश केलेल्या सर्वांचे हार्दिक स्वागत !
— Ravindra Chavan (@RaviDadaChavan) June 17, 2025
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली 'विकसित भारत' घडत आहे, तसेच आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात समृद्ध महाराष्ट्र घडविण्याच्या मार्गावर आपण सर्वजण वाटचाल करत आहोत. हीच बाब राज्यातील विविध पक्षांतील… pic.twitter.com/QZwgqmR4TN
नितेश राणेंनी लावले होते गंभीर आरोप
बडगुजर उद्धवसेनेत असताना भाजपा नेते नितेश राणे यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप लावले होते. विधानसभेत नितेश यांनी एक फोटो दाखवून दहशतवादी सलीम कुत्तासोबत सुधाकर बडगुजर यांचे कनेक्शन असल्याचे म्हटले होते. नितेश राणे म्हणाले होते की, १९९३ च्या मुंबईत बॉम्बस्फोटात आरोपी दाऊदचा जवळचा सहकारी सलीम कुत्ता याच्या पॅरोल दरम्यान एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत सुधाकर बडगुजर यांचा समावेश होता. सलीम बॉम्बस्फोटातील आरोपात दोषी आढळला होता. या स्फोटात २५७ लोक ठार झाले होते तर ७०० हून अधिक जखमी होते.
नितेश राणे यांनी विधानसभेत सलीम कुत्ता आणि सुधाकर बडगुजर यांचा फोटो दाखवून केलेल्या आरोपाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. या प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष तपास पथक नेमून चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र आता याच सुधाकर बडगुजर यांना भाजपात घेण्यात आले आहे. त्यामुळे नितेश राणे यांनी प्रतिक्रिया पत्रकारांनी विचारली असता हिंदुत्वासाठी कोण काम करायला तयार असेल तर आक्षेप घेण्याचं कारण नाही असं सांगितले आहे.