पुढच्या ६ महिन्यांत देशात उद्रेक होईल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 07:08 AM2018-05-31T07:08:35+5:302018-05-31T07:08:35+5:30

देशात २०१४ सालानंतर सत्तेत आलेल्या भारतीय जनता पार्टीकडून संविधानातच बदल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे पुढील सहा महिन्यांत देशात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही

In the next 6 months, there will be an outbreak in the country! | पुढच्या ६ महिन्यांत देशात उद्रेक होईल!

पुढच्या ६ महिन्यांत देशात उद्रेक होईल!

Next

मुंबई : देशात २०१४ सालानंतर सत्तेत आलेल्या भारतीय जनता पार्टीकडून संविधानातच बदल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे पुढील सहा महिन्यांत देशात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे. भाजपाकडून लोकशाहीविरोधी पावले उचलली जात असल्याचा आरोप करत राज्यातील धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षांसह संस्था व संघटनांच्या प्रतिनिधींनी एकजूट करत ‘मित्र लोकशाहीचे’ हा फोरम स्थापित केला आहे. या फोरमने मुंबई मराठी पत्रकार संघात बुधवारी आयोजित केलेल्या ‘संवादातून सहमतीकडे २०१९’ या परिसंवादात चव्हाण बोलत होते.
या फोरममध्ये एकत्रित आलेल्या सर्व पक्षांमध्ये कोणीही मोठा भाऊ नसून, इथे सर्वच जुळे भाऊ असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. ते म्हणाले, सत्ता मिळविण्यासाठी नव्हे, तर लोकशाही टिकविण्यासाठी सर्व जणांनी एकवटले पाहिजे. भाजपाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातील शासन आणि अनेक सत्तांतरे पाहिली. मात्र २०१४ सालानंतर देशात उद्भवलेल्या परिस्थितीइतकी वाईट परिस्थिती याआधी कधीही पाहिली नाही. त्यामुळे लोकशाहीचे पुरस्कर्ते एकत्र आले नाही, तर २०१९ सालानंतर निवडणुका होतील का? अशी भीती सगळ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनाही सरकारविरोधात पत्रकार परिषद घ्यावी लागत असेल, तर लोकांनी जायचे तरी कुठे, असा सवालही चव्हाण यांनी उपस्थित केला. केवळ पैसा आणि शक्ती यांच्या जोरावर भाजपा निवडणुका जिंकत आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांकडून साम, दाम, दंड, भेद वापरण्याची भाषा केली जात आहे. म्हणूनच एकट्याने पुढे जाणे कुणासाठीही शक्य नसून सर्वांनी एकत्र येत समान कार्यक्रमाची आखणी करून लोकशाही टिकवली पाहिजे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, सत्ता येत-जात असते. त्याचे दु:ख वाटून घ्यायचे नसते. मात्र आत्ता ज्यांच्या हाती सत्ता आहे, त्यांच्यामुळे चिंता करण्याची गरज आहे. प्रसारमाध्यम, न्यायव्यवस्था, निवडणूक घेण्याची व्यवस्था यांवर गेल्या चार वर्षांत सरकारने प्रभाव तयार केला आहे. म्हणूनच आपापसांतील मतभेद विसरून लोकशाहीसाठी एकत्र आले पाहिजे. कारण आघाडी सरकारच्या काळात आंदोलन करणाऱ्या राजू शेट्टी यांना कदाचित पुढील काळात लोकशाहीच राहिली नाही, तर आंदोलनही करता येणार नसल्याची भीती पाटील यांनी व्यक्त केली.

गोपीनाथ मुंडे यांच्या चेहºयाला भुललो!
आमचे प्रश्न तडीस जाणार नसतील तर हे कुणासाठी करायचे, असा सवाल शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, एकट्याने चळवळी घेऊन आम्ही लढत आहोत. एक शेतकरी चळवळ सोडली, तर इतर चळवळी शांत झाल्या आहेत. राज्यातल्या सहकार बुडाला असून बँकांची अवस्था बिकट आहे. गोपीनाथ मुंडे यांचा चेहरा आपलासा वाटला म्हणून भोळी आशा घेऊन आम्ही त्यांच्याकडे गेलो. मात्र वास्तविक परिस्थिती समजताच सगळ्यात आधी आम्हीच तिथून बाहेर पडल्याची कबुलीही शेट्टी यांनी कार्यक्रमात दिली.

...तर शिवसेनाही सोबत!
आणखी थोडा काळ गेला, तर शिवसेनापण आपल्याकडे पाहील, असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले. पहिल्यांदा भाजपाने मित्राला चिरडायला सुरुवात केली आहे. त्यानंतर विरोधकांची वेळ येईल, असेही ते म्हणाले.

भाजपाविरोधात दिग्गजांची एकजूट!
भाजपाविरोधात मूठ बांधण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जोडीला डावे पक्ष आणि समविचारी संस्थांचे पदाधिकारी आले आहेत.

Web Title: In the next 6 months, there will be an outbreak in the country!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.