रवींद्र चव्हाण यांच्यावर भाजपकडून नवी जबाबदारी! चंद्रशेखर बावनकुळेंनी तीन समित्यांची केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 19:00 IST2024-12-28T18:58:43+5:302024-12-28T19:00:50+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळालेले माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे भाजपकडून नवी जबाबदारी देण्यात आली आहे.

रवींद्र चव्हाण यांच्यावर भाजपकडून नवी जबाबदारी! चंद्रशेखर बावनकुळेंनी तीन समित्यांची केली घोषणा
गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरू होती. पण, रवींद्र चव्हाण यांच्यावर नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन समित्यांची आणि त्यांच्या प्रमुखांच्या नावाची घोषणा शनिवारी (२८ डिसेंबर) केली. प्रदेश संघटन पर्व समिती, प्रदेश अनुशासन समिती आमि प्रदेश सक्रिय सदस्यता अभियान अशा तीन समित्यांची घोषणा करण्यात आली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष बदलले जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना तीन समित्यांची घोषणा करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे रवींद्र चव्हाण यांचे नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत होते. त्यांची प्रदेश संघटन पर्व समितीचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन समित्यांची घोषणा केली. यात प्रदेश संघटनपर्व समितीचे प्रदेश प्रभारी म्हणून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली आहे. भाजपाच्या संघटनात्मक बांधणीच्या नियोजनाची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे. महाराष्ट्रात 21 डिसेंबरपासून संघटनपर्व सुरू करण्यात आले आहे. या पर्वाची सुरुवात नागपूर येथून करण्यात आली.
भारतीय जनता पार्टी संघटन पर्व महाराष्ट्र प्रभारीपदी माजी मंत्री आ. @RaviDadaChavan जी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आ. रवींद्र चव्हाणजी यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.#BJP#Maharashtra#ChandrashekharBawankulepic.twitter.com/Ctga2JbIqQ
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) December 28, 2024
प्रदेश अनुशासन समितीच्या अध्यक्षपदी माजी आमदार प्रा. अनिल सोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीत छत्रपती संभाजीनगरचे किशोर शितोळे, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, मुंबईचे माजी आमदार अतुल शाह आणि पुणे येथील योगेश गोगावले यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रदेश सक्रिय सदस्यता अभियानाची घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे. अभियानाच्या प्रमुखपदी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे (पुणे) व बीड येथील प्रवीण घुगे यांची अभियान सहप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या तीनही समित्यांच्या प्रमुखांची पत्रे प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून काढण्यात आले आहे.