NEET: नीट परीक्षेचे मार्क वाढवून देतो, पैसे द्या; दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 11:57 IST2025-06-15T11:55:38+5:302025-06-15T11:57:11+5:30

नीट परीक्षा घेणाऱ्या व्यवस्थापनात आपली ओळख असून जर तुमच्या पाल्याचे गुण वाढवून हवे असतील तर पैसे द्या, अशी मागणी करणाऱ्या दोघांना अटक झाली.

NEET exam marks will be increased, pay money; Two arrested | NEET: नीट परीक्षेचे मार्क वाढवून देतो, पैसे द्या; दोघांना अटक

NEET: नीट परीक्षेचे मार्क वाढवून देतो, पैसे द्या; दोघांना अटक

मुंबई: नीट परीक्षा घेणाऱ्या व्यवस्थापनात आपली ओळख असून जर तुमच्या पाल्याचे गुण वाढवून हवे असतील तर पैसे द्या, अशी मागणी करणाऱ्या दोघांना सीबीआयने अटक केली आहे.  यांपैकी एका आरोपीचे नाव संदीप शहा असून, तो सोलापूरचा रहिवासी आहे, तर दुसऱ्या व्यक्तीचे नाव सलीम पटेल असून, तो नवी मुंबईचा आहे. सलीम पटेल याची नवी मुंबईत शैक्षणिक संस्था आहे. 

या दोन आरोपींच्या वतीने गुण वाढवून देण्याचे प्रलोभन दाखवत पालकांना गंडा घातला जात असल्याचे समजल्यावर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने संदीप शहा याच्याशी संपर्क साधत मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्याची भेट घेतली. 

सीबीआयच्या अधिकाऱ्याने, तो पालक असून त्याच्या मुलाचे गुण वाढवायचे असल्याचे शहा याला सांगितले. शहा याने हे काम करण्यासाठी ९० लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती ही रक्कम ८७ लाख ५० हजार रुपये इतकी निश्चित झाली. नीट परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वी सहा तास अगोदर मी गुण वाढवून देईन, असे आश्वासनही त्याने दिले.

या दोघांचे मोबाइल फोन जप्त करण्यात आले असून ते फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहेत. त्यांच्यामध्ये अनेक वेळा संवाद झाला असून, अनेकांची गुणपत्रिका, प्रवेश पत्रिकांचे फोटो त्यांच्या मोबाइलमध्ये आढळून आले.

असा अडकला... 
शहा याने यापूर्वी एका पालकाकडून  २५ लाख रुपये स्वीकारल्याची माहिती सीबीआयकडे होती. या चर्चेनंतर सीबीआयच्या अधिकाऱ्याने स्वतःची ओळख सांगत त्याला या २५ लाख रुपयांसदर्भात विचारणा केली. त्यावेळी शहा याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर सीबीआयने त्याला अटक केली. त्याच्या चौकशीतून तो नवी मुंबईतील सलीम पटेलच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे अधिकाऱ्यांनी पटेल याला अटक केली. 

Web Title: NEET exam marks will be increased, pay money; Two arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.