“संविधान जनमानसात रुजवणे ही काळाची गरज, ‘संविधान प्रत्येक घरात’चा संदेश...”: नीलम गोऱ्हे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 16:21 IST2025-11-26T16:21:12+5:302025-11-26T16:21:59+5:30
Constitution Day 2025: संविधान दिनानिमित्त भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

“संविधान जनमानसात रुजवणे ही काळाची गरज, ‘संविधान प्रत्येक घरात’चा संदेश...”: नीलम गोऱ्हे
Constitution Day 2025: संविधान दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरातील वंदे मातरम सभागृह येथे भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात प्रमुख मान्यवर म्हणून विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट उपस्थित होते. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपल्या प्रभावी भाषणातून संविधान व सामाजिक न्याय या विषयाला व्यापक ऐतिहासिक व सामाजिक संदर्भ जोडत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
आपण उद्देशिका वाचली आणि भारताच्या राज्यघटनेत दिलेल्या समानतेच्या अधिकारांची पुन्हा जाण करून घेतली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी असामान्य दूरदृष्टीने देशासाठी समतेचा पाया घातला. महिलांना मतदानाचा अधिकार असो, एकपत्नीत्वाचा कायदा असो किंवा हिंदू कोड बिल — या सर्व सुधारणांसाठी बाबासाहेबांनी संघर्ष केला. प्रत्येक गावात संविधान पोहोचवणे गरजेचे आहेच, पण आता प्रत्येक घरात संविधान पोहोचले पाहिजे. घरातच मुलींचे अत्याचार, हुंडा, छळ यांसारख्या समस्या घडत असतात. समाजमाध्यमांवरील असंयमित वक्तव्ये व द्वेषपूर्ण भाष्येही आज आव्हान ठरत आहेत. संविधानाचा खरा अर्थ व मूल्ये आपल्या वर्तनात उतरायला हवीत, असे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.
बाबासाहेबांची कर्मभूमी संभाजीनगर, संविधान सगळ्यांसाठी
संभाजीनगर ही बाबासाहेबांची कर्मभूमी असल्याने येथे संविधान दिन कार्यक्रम आयोजित करणं अत्यंत अर्थपूर्ण आहे. संविधानाने आपल्याला न्याय, समता, स्वातंत्र्य व बंधुता दिली. अतिरेकी असो वा कुणीही, कायद्यापुढे सर्व समान आहेत. लोकशाहीची मुळे रुजवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे बाबासाहेब. पुढील दोन महिन्यांत बार्टीचे मुख्य कार्यालय संभाजीनगरमध्ये येत आहे. बाबासाहेबांनी त्यांच्या काळात या शहराचे केंद्र म्हणून महत्त्व ओळखले होते. संविधान सर्वांसाठी आहे आणि ते वंचित घटकांपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे, असे संजय शिरसाट म्हणाले.
दरम्यान, डॉ. गोऱ्हे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या उपक्रमांचे कौतुक करत बार्टीचे मुख्य कार्यालय संभाजीनगरमध्ये येणार असल्याबद्दल अभिनंदन व्यक्त केले. संभाजीनगर हे केवळ मराठवाड्याचे नव्हे तर महाराष्ट्राच्या अस्मितेचे केंद्र आहे, असे सांगत त्यांनी सामाजिक परिवर्तनासाठी सातत्यपूर्ण कार्यक्रम राबविण्याचे महत्त्व मांडले.