पुण्यात ३ ऑक्टोबरला राष्ट्रवादीचा 'संविधान बचाव' कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 14:10 IST2018-09-25T14:09:21+5:302018-09-25T14:10:39+5:30
सरकारचे न्यायव्यवस्था, निवडणूक आयोगावरही नियंत्रण आहे. त्यामुळे लोकशाही धोक्यात आली असल्याने संविधान बचाव कार्यक्रम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्यात ३ ऑक्टोबरला राष्ट्रवादीचा 'संविधान बचाव' कार्यक्रम
पुणे : येत्या ३ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे संविधान बचाव, देश बचाव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री फौजिया खान यांनी दिली. यावेळी खासदार वंदना चव्हाण, विद्या चव्हाण, महिला शहराध्यक्षा रुपाली चाकणकर, वैशाली नागवडे आदी उपस्थित होते.
पुण्यात खान यांनी बैठक घेत तीन तारखेच्या कार्यक्रमाची आखणी केली. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते उपस्थित असणार असल्याची माहिती खान यांनी दिली. त्या म्हणाल्या की, देशात सध्या असलेल्या स्थितीमुळे संविधान धोक्यात आले आहे. सरकारचे न्यायव्यवस्था, निवडणूक आयोगावरही नियंत्रण आहे. त्यामुळे लोकशाही धोक्यात आली असल्याने संविधान बचाव कार्यक्रम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले. पुढे त्या म्हणाल्या की, दिल्ली, मुंबई, नाशिक, औरंगाबादनंतर आम्ही पुण्यात हा कार्यक्रम घेत असून त्यानंतर औरंगबाद आणि कोकण विभागातही हा कार्यक्रम करणार आहोत. यावेळी त्यांनी सरकारच्या ईव्हीएम मशीन धोरणावरही टीका केली.