बाबा सिद्दीकींचा काँग्रेसला रामराम; NCP अजितदादा गटाची प्रतिक्रिया, “ही तर सुरुवात...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 13:21 IST2024-02-08T13:19:45+5:302024-02-08T13:21:51+5:30
NCP Sunil Tatkare Reaction on Baba Siddique Resigns Congress: आगामी काळात असेच काही धक्के पाहायला मिळाले, तर आश्चर्य वाटायला नको, असे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून करण्यात आले आहे.

बाबा सिद्दीकींचा काँग्रेसला रामराम; NCP अजितदादा गटाची प्रतिक्रिया, “ही तर सुरुवात...”
NCP Sunil Tatkare Reaction on Baba Siddique Resigns Congress: केंद्रीय स्तरावर इंडिया आघाडी आणि राज्य स्तरावरील महाविकास आघाडी यांच्यातील अस्वस्थता आणि बिघाडी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई काँग्रेसचे बडे नेते मिलिंद देवरा यांनी पक्षाला रामराम करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. या घटनेला काही दिवस लोटले असतानाच मुंबईतील काँग्रेसचे दुसरे बडे नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. बाबा सिद्दीकी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती.
एक्सवर एक पोस्ट शेअर करत बाबा सिद्दीकी यांनी आपला निर्णय जाहीर केला. मी तरुण असताना काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि आता ४८ वर्षांनी पक्ष सोडत आहे. माझा हा प्रवास खूप छान होता. माझ्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनाम देत आहे. आणखी अनेक गोष्टी आहेत ज्या आत्ताच सांगणे योग्य होणार नाही. काही गोष्टी या न सांगितलेल्याच बऱ्या असतात. माझ्या या प्रवासात ज्या-ज्या लोकांनी मला पाठिंबा दिला, त्यांचा मी आभारी आहे, असे सांगत बाबा सिद्दीकी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. यावरून आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भाष्य करत काँग्रेसवर टीका केली आहे.
आगामी काळात असेच काही धक्के पाहायला मिळाले, तर आश्चर्य वाटायला नको
बाबा सिद्दीकी यांचा राजीनामा म्हणजे काँग्रेसमधील प्रचंड अस्वस्थता आणि खदखद यांचे द्योतक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बाबा सिद्दीकी यांनी मुंबई आणि परिसरात आपले वर्चस्व स्थापन केले आहे. काँग्रेस विचाराची माणसे पक्षापासून का दूर जात आहेत, याचे आत्मचिंतन करण्याची वेळ त्यांच्यावर नक्कीच येणार आहे. ही तर सुरुवात आहे. आगामी काळात असेच काही धक्के पाहायला मिळाले, तर आश्चर्य वाटायला नको, असे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाला काही फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. यावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, ही एक बोलण्याची पद्धत आहे. बाबा सिद्दिकी राज्याच्या मंत्रिमंडळात दीर्घ काळ होते. त्यांचे चिरंजिव त्या मतदारसंघातून निवडून आले आहेत. अशी विधाने करून स्वतःचे अपयश झाकण्याचा प्रयत्न आहे. अपयश झाकण्याचा माणसे प्रयत्न करतात, तेव्हा ते सत्य परिस्थितीपासून दूर जातात, अशी टीका सुनील तटकरे यांनी केली.