“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 18:13 IST2025-09-25T18:12:12+5:302025-09-25T18:13:15+5:30
NCP SP Group Jayant Patil: शेतकरी संकटात आहे. सरकारने केवळ घोषणा न करता तातडीने निर्णय घ्यावा आणि न्याय द्यावा, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
NCP SP Group Jayant Patil: शेतकऱ्यांच्या शिवारात उभे असलेले सोनेरी पीक काही क्षणांत नष्ट झाले. शेतकरी डोळ्यांत अश्रू घेऊन आपला संसार उद्ध्वस्त होताना बघत आहे. शेतकऱ्यांना पंचनाम्याच्या प्रक्रियेत अडकवून अधिक मानसिक छळ देण्यापेक्षा सरसकट नुकसानभरपाई देणे हाच योग्य मार्ग आहे. त्यामुळे एकरी किमान ₹५०,००० इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केली.
जयंत पाटील आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली. यावेळी त्यांनी ही मागणी केली आहे. यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आ. अभिजीत पाटील, आ. नारायण पाटील, जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष रविंद्र पाटील, युवक जिल्हाध्यक्ष सूरज देशमुख, युवती जिल्हाध्यक्ष विनंती कुलकर्णी आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
सरकारने केवळ घोषणा न करता तातडीने निर्णय घ्यावा
जयंत पाटील पुढे म्हणाले की, माढा तालुक्यातील शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती डोळ्यात पाणी आणणारी आहे. काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल झाला आहे. आधीच शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला होता, त्यातच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरले अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आज शेतकरी संकटात आहे. सरकारने केवळ घोषणा न करता तातडीने निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा त्यांनी सरकारकडून व्यक्त केली.