“धनंजय मुंडे CM फडणवीस-अजितदादांचे खास, कितीही पुरावे द्या, राजीनामा अशक्य”; कुणी केला दावा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 17:48 IST2025-01-29T17:45:19+5:302025-01-29T17:48:24+5:30

Sandeep Kshirsagar Reaction On Demand Of Dhananjay Munde Resignation: विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र होत जात असून, महायुती सरकारवर दबाव वाढत असल्याचे सांगितले जात आहे.

ncp sp group sandeep kshirsagar claims dhananjay munde is close to cm devendra fadnavis and ajit pawar his resignation is impossible | “धनंजय मुंडे CM फडणवीस-अजितदादांचे खास, कितीही पुरावे द्या, राजीनामा अशक्य”; कुणी केला दावा?

“धनंजय मुंडे CM फडणवीस-अजितदादांचे खास, कितीही पुरावे द्या, राजीनामा अशक्य”; कुणी केला दावा?

Sandeep Kshirsagar Reaction On Demand Of Dhananjay Munde Resignation: बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातलं राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असून एकजण अद्याप फरार आहे. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलने केली आहेत. दुसरीकडे, या प्रकणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी लावून धरली होती. आता या मागणीसाठी अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यानंतर अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. परंतु, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र होत आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी मोठ्या प्रमाणात विरोधकांकडून दबावतंत्राचा वापर केला जात आहे. यातच आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा अशक्य असल्याचा दावा करण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सध्या सीआयडी, विशेष चौकशी पथक आणि न्यायालयीन अशी तिहेरी चौकशी चालू आहे. अद्याप या चौकशीत कोणाच्या सहभागाबाबत ठोस निष्कर्ष समोर आलेला नाही. कोणी मागणी केली म्हणून लगेचच राजीनामा घेतला जाणार नाही. पुरावे असल्याशिवाय कारवाई केली जाणार नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा फेटाळून लावली. यानंतर आता पुन्हा एकदा अंजली दमानिया तसेच विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संदीप क्षीरसागर यांनी प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे यांचा राजीनामा अशक्य असल्याचा दावा केला आहे.

धनंजय मुंडे CM फडणवीस-अजितदादांचे खास, राजीनामा अशक्य

संदीप क्षीरसागर यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. अंजली दमानिया यांना या पोस्टमध्ये टॅगही केले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, वाल्मीक कराड जसा धनंजय मुंडेंचा खास आहे, तसे धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीस व अजित पवारांचे खास आहेत. त्यामुळे राजीनामा अशक्य आहे. भले कितीही पुरावे द्या तुम्ही, असे संदीप क्षीरसागर यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी संदीप क्षीरसागर यांच्या दाव्यावर धनंजय मुंडे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर धनंजय मुंडे म्हणाले की, या सर्व गोष्टींमध्ये मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना दोषी वाटत असेन, तर त्यांनी माझा राजीनामा मागावा; मी राजीनामा देणार. पण, फक्त हा विषय काढून राजीनामा होत असेल, याबाबतीत मी दोषी आहे की नाही; हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सांगू शकतील. त्या गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजे ना. ५१ दिवस ज्या पद्धतीने ट्रायल सुरू आहे. टार्गेट मी आहे. मी पक्षाचा निष्ठावंत आहे. महायुतीच्या प्रचारातील प्रमुख व्यक्ती आहे. आपण निवडणुकीत टीका करतो. टीका सहनही करतो. पण, याबद्दलचा राग पुन्हा नसतो. माझी नैतिकता माझ्या लोकांच्याबद्दल प्रामाणिक आहे. जी गोष्ट घडलीय, त्या घटनेच्या बाबतीत मी जे बोललोय, ते अतिशय प्रामाणिक आहे. त्यामुळे मला स्वतःला नैतिकतेने वाटत नाही. त्यामुळे माझा दोष सांगावा लागेल. माझ्या वरिष्ठांनी सांगावा लागेल. तेच माझे म्हणणे आहे, असे धनंजय मुंडे यांनी स्पष्टपणे सांगितले.
 

Web Title: ncp sp group sandeep kshirsagar claims dhananjay munde is close to cm devendra fadnavis and ajit pawar his resignation is impossible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.