“धनंजय मुंडे अन् पंकजा मुंडेंनी संतोष देशमुख कुटुंबाची भेट घेतली का”; बजरंग सोनावणेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 13:59 IST2025-01-16T13:58:32+5:302025-01-16T13:59:09+5:30

NCP SP MP Bajrang Sonawane News: पाच वर्ष पंकजा मुंडे कामातून बाजूला होत्या. आता कामाला लागल्या असतील. त्यामुळे त्यांना परळीची माहिती नसेल, अशी खोचक टीका बजरंग सोनावणे यांनी केली.

ncp sp group mp bajrang sonawane asked did dhananjay munde and pankaja munde meet the santosh deshmukh family | “धनंजय मुंडे अन् पंकजा मुंडेंनी संतोष देशमुख कुटुंबाची भेट घेतली का”; बजरंग सोनावणेंचा सवाल

“धनंजय मुंडे अन् पंकजा मुंडेंनी संतोष देशमुख कुटुंबाची भेट घेतली का”; बजरंग सोनावणेंचा सवाल

NCP SP MP Bajrang Sonawane News: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील मुख्यसूत्रधार म्हटला जाणारा वाल्मीक कराड याच्यावर मकोका लावण्यात आला आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. विरोधकांनी हे प्रकरण चांगलेच लावून धरले असून, महायुती सरकार आणि गृहमंत्रालयावर जोरदार हल्लाबोल करत आहेत. या प्रकरणातील एक आरोपी अद्यापही फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणी सुरुवातीपासूनच आक्रमक असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बजरंग सोनावणे यांनी पुन्हा एकदा या प्रकरणावरून गृहखाते आणि महायुती सरकारवर टीका केली आहे.

या प्रकरणातील आरोपींना पळून जाण्यासाठी कुणीतरी मदत करत आहे. फरार असलेला आरोपी सापडला पाहिजे. दुसरा आरोपी पुण्यातून सापडला, मी आधी सांगितले होते की पुणे कनेक्शन तपासा. एवढे दिवस होऊनही पोलिसांना मोबाइल का सापडत नाही, असा प्रश्न बजरंग सोनावणे यांनी विचारला. तसेच आमची सुरक्षा ही सरकारची जबाबदारी आहे. काय करायचे हे सरकार ठरवेल, असेही बजरंग सोनावणे यांनी म्हटले आहे. 

धनंजय मुंडे-पंकजा मुंडेंनी संतोष देशमुख कुटुंबाची भेट का घेतली नाही

अवैधरित्या मालमत्ता असतील तर चौकशी झाली पाहिजे. १०० कोटीपेक्षा पुढे ईडी येतेच. मंजिरी कराड यांच्यावर मला काही बोलायचे नाही. माझे काम, माझे आयुष्य खुली किताब आहे. माझे काय प्रकरण बाहेर काढायचे ते काढा. माझ्यावर आरोप करत असतील, तर त्यांना करू द्या, असे सोनावणे म्हणाले. तसेच पाच वर्ष पंकजा मुंडे कामातून बाजूला होत्या. आता कामाला लागल्या असतील. त्यामुळे त्यांना परळीची माहिती नसेल. परळी शांत ठेवणे तेथील लोकप्रतिनिधी जबाबदारी आहे. लोकप्रतिनिधींनी जबाबदारी झटकून चालणार नाही, असे सोनावणे यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी वाल्मीक कराडच्या कुटुंबाची भेट घेतल्याचा दावा केला जात आहे. यावर बोलताना बजरंग सोनावणे म्हणाले की, आता धनंजय मुंडे यांनी वाल्मीक कराडच्या कुटुंबाला भेटले की नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन करणे गरजेचे होते. संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे. ती व्यक्ती आता आमच्यात नाही. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेण्याची गरज आहे, असे बजरंग सोनावणे यांनी म्हटले आहे.
 

Web Title: ncp sp group mp bajrang sonawane asked did dhananjay munde and pankaja munde meet the santosh deshmukh family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.