“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 13:53 IST2025-07-20T13:49:31+5:302025-07-20T13:53:23+5:30

Manikrao Kokate News: माणिकराव कोकाटे मोबाइलवर रमी खेळत असल्याचा व्हिडिओ समोर येताच शेतकरी नेते, विरोधकांनी चांगलाच संताप व्यक्त केला.

ncp sp group jitendra awhad congress vijay wadettiwar and other opposition leaders slams minister manikrao kokate over playing rummy game in assembly | “शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका

“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका

Manikrao Kokate News: एकीकडे शेतकरी कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न यांवरून महाविकास आघाडीसह विरोधक महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाइलवर गेम खेळतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. रोहित पवार यांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर आता यावरून कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर विरोधकांकडून चौफेर टीकेचा भडिमार होताना पाहायला मिळत आहे. विधानसभेच्या सभागृहात बसून माणिकराव कोकाटे मोबाइलवर रमी खेळत असल्याचा व्हिडिओ समोर येताच शेतकरी नेतेही चांगलेच संतापले आहेत.

सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी. रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतर ची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची   “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का? अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे. तसेच “#जंगली_रमी_पे_आओ_ना_महाराज…!” #कधी_शेतीवर_या_महाराज #खेळ_थांबा_कर्जमाफी_द्या, असे हॅशटॅगही दिले आहेत.

शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर एक फोटो पोस्ट करत माणिकराव कोकाटे यांच्यावर निशाणा साधला. शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी एक फोटो शेअर करत टीका केली. कृषिमंत्री किती बेजबाबदार आहेत याचे हे उदाहरण आहे परंतु हे पहिले नाही. याच कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्याची तुलना भिकाऱ्यासोबत केली. शेतकरी कर्जमाफीचा पैसा लग्नात, साखरपुड्यात उधळतात असे बोलले आणि आता हा माणूस विधानसभा सभागृहात रमी खेळत असेल तर त्यांची तुलना कुणासोबत करायची, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना अशी माणसं चालतातच कशी? या महाराष्ट्राचा बट्ट्याबोळ झाला आहे. दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या करतायेत. यांना लाज कशी वाटत नाही, असा घणाघात शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केला.

शेतकऱ्यांचे दुर्दैव, कृषीमंत्रीच रम्मी खेळत आहे

शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे. कृषीमंत्रीच रम्मी खेळत आहे. शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात त्यांनी विधानसभेत समिती गठीत गेली. शेतकरी आत्महत्या होणार नाही, यासाठी काय उपाययोजना करता येतील, म्हणून ती समिती काम करणार आहे. आमच्या कृषीमंत्र्यांची ही आठवी ते नववी चूक असेल. यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या? इकडे शेतकऱ्यांना सांगायचे की, तुम्ही दारू पिता, लग्नात खर्च होतो म्हणून तुमच्यावर कर्ज होत आहे आणि आमचा कृषीमंत्रीच रमी खेळत असेल, तर आमच्या शेतकऱ्यांचे भले काय होईल, असा सवाल बच्चू कडू यांनी केला.

दरम्यान, शेतकरी मरतोय आणि कृषिमंत्री रम्मी खेळतोय. या खोटारड्या, धोकेबाज सरकारला शेतकऱ्यांशी काही देणेघेणे राहिले नाही, म्हणून माझे शेतकरी बांधवांना आवाहन आहे यांना धडा शिकवा. भाजपवाल्यानी कोकाटे यांना केवळ नावालाच मंत्री केले आहे. त्यामुळे यांना काम उरलेले नाही, म्हणून ते रमी खेळत आहे. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा अशी अवस्था झाली आहे, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. 

Web Title: ncp sp group jitendra awhad congress vijay wadettiwar and other opposition leaders slams minister manikrao kokate over playing rummy game in assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.