“बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार दोघेही मला आदराच्या स्थानीच आहेत”: छगन भुजबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 16:52 IST2025-04-10T16:50:55+5:302025-04-10T16:52:29+5:30

NCP SP Group Chhagan Bhujbal News: बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत अगदी जवळून काम करण्याची संधी मिळाली. म्हटले तर त्यांचा राइट हँड होतो, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

ncp sp group chhagan bhujbal and balasaheb thackeray and sharad pawar both are in a position of respect for me | “बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार दोघेही मला आदराच्या स्थानीच आहेत”: छगन भुजबळ

“बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार दोघेही मला आदराच्या स्थानीच आहेत”: छगन भुजबळ

NCP SP Group Chhagan Bhujbal News: राष्ट्रवादीमध्ये फूट जरी पडली असली तरी काही ना काही निमित्ताने दोन्ही गटांचे नेते एकमेकांना भेटतात. एकमेकांशी संवाद कायम ठेवला आहे. शरद पवार हेच आपले दैवत असल्याचे दोन्ही गटांकडून वारंवार सांगितले जाते. अलीकडेच एका बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि शरद पवार एकत्र आले होते. राष्ट्रवादीतील दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार अशी चर्चाही अनेकदा राजकीय वर्तुळात रंगत असते. यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले एक विधान चर्चेत आहे. यानंतर आता छगन भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याबाबत आदर असल्याचे म्हटले आहे. 

आम्हीसुद्धा आमच्या कुटुंबात कालही शरद पवारांना दैवत मानत होतो आणि आजही मानतो. परंतु, आज देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा मजबूत नेता मिळालेला आहे. आज त्यांच्या पाठीशी उभे राहणे, देशाची प्रगती करून घेणे. जगात देशाचा मान-सन्मान वाढवण्याकरिता त्यांना पाठबळ देणे, हे आपले काम होते. म्हणून आपण त्या ठिकाणी गेलो. परंतु, सारखे आपले तळ्यात मळ्यात, काहीच कळत नाही. तसे होऊ देऊ नका, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका सभेला संबोधित करताना म्हटले होते. पत्रकारांशी बोलताना छगन भुजबळ यांनी यासंदर्भात भाष्य केले.

बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार दोघेही मला आदराच्या स्थानीच आहेत

माझे भाग्य आहे की, २५ ते २७ वर्ष मला बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा नेता मिळाला. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत अगदी जवळून काम करण्याची संधी मिळाली. म्हटले तर त्यांचा राइट हँड होतो मी. त्यानंतर शरद पवार यांच्यासारखा नेता मिळाला. हे दोघेही मोठे नेते आहेत. या दोन्ही नेत्यांमुळे खूप शिकायला मिळाले. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे दोन्ही नेते मला आदराच्या स्थानीच आहेत.

दरम्यान, राजकीय आयुष्याच्या वाटचालीत नक्की कोण कोणाचा प्रतिस्पर्धी हे सांगणे अवघड असते. एकमेकांचे पाय ओढणे, एकमेकांच्या उरावर बसणे याला रोजच्या राजकीय जीवनात सामोरे जावे लागते. कोण कोणाला धोबी पछाड करेल, हे सांगता येत नाही. कुस्तीप्रमाणेच राजकारणतही डावपेच आणि डाव-प्रतिडाव सुरू असतात असे मत आमदार छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

 

Web Title: ncp sp group chhagan bhujbal and balasaheb thackeray and sharad pawar both are in a position of respect for me

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.