आंदोलनामागे शरद पवार असल्याचा दावा; जयंत पाटील म्हणाले, “साहेबांनी मनोज जरांगेंना...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 15:26 IST2024-02-23T15:25:13+5:302024-02-23T15:26:48+5:30
Maratha Reservation NCP Sharad Pawar Group Jayant Patil News: मनोज जरांगेंच्या आंदोलनांचा सगळा खर्च शरद पवारांनी केला. शरद पवार सांगतात तसेच ते ऐकतात, असा मोठा दावा करण्यात आला आहे.

आंदोलनामागे शरद पवार असल्याचा दावा; जयंत पाटील म्हणाले, “साहेबांनी मनोज जरांगेंना...”
Maratha Reservation NCP Sharad Pawar Group Jayant Patil News: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा आंदोलनाची नवी दिशा काय असेल हे स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने शिक्षण आणि नोकरीत स्वतंत्र १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असला तरी मनोज जरांगे आंदोलनावर ठाम आहेत. मात्र, आता मराठा आंदोलकांमध्ये फूट पडल्याचे चित्र असल्याची चर्चा आहे. यातच या आंदोलनामागे शरद पवार असल्याचा दावा करण्यात आला होता. याला जयंत पाटील यांनी उत्तर दिले.
आंदोलनात सहभागी असलेल्या अजय महाराज बारसकर यांनी मनोज जरांगे यांच्यावर घणाघाती टीका करत गंभीर आरोप केले. यानंतर संगीता वानखेडे या महिला आंदोलकाने मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल केला. शरद पवारांचा हात या आंदोलनामागे आहे, असा दावा केला होता. यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर जयंत पाटील यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले.
आंदोलनामागे शरद पवार असल्याचा दावा; जयंत पाटील म्हणाले...
या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले की, मनोज जरांगे यांच्याशी कधीही शरद पवार साहेबांचा संपर्क आलेला नाही, त्यांचा संपर्क कोणाशी आहे? हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती असावे असा माझा अंदाज आहे. मुख्यमंत्री व मनोज जरांगे पाटील यांच्या संवादात कशामुळे विसंवाद तयार होतो? याचा अभ्यास करून सरकारने अशी आंदोलने वारंवार होणार नाहीत याची जबाबदारीने काळजी घेतली पाहिजे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, राज्य सरकारने दिलेले आरक्षण मान्य नसल्याने मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर २४ फेब्रुवारीपासून राज्यभरात आंदोलन सुरू होणार आहे. या आंदोलनावरुन कायदेशीर लढाई सुरू झाली असून, मुंबई उच्च न्यायालयाने मनोज जरांगे यांना नोटीस पाठवली आहे. न्यायालयाने जरांगे यांच्या आंदोलनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, भूमिका स्पष्ट करण्याचेही न्यायालयाने बजावले आहे.