राष्ट्रवादी (शरद पवार) चा विरोधकांवरच बहिष्कार? अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या बैठकीकडे पाठ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 06:29 IST2026-02-23T06:26:55+5:302026-02-23T06:29:08+5:30
अधिवेशनाची रणनीती ठरविण्यासाठी विरोधी पक्षांची जी बैठक झाली, त्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा एकही नेता उपस्थित नव्हता.

राष्ट्रवादी (शरद पवार) चा विरोधकांवरच बहिष्कार? अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या बैठकीकडे पाठ
मुंबई : राष्ट्रवादीने (शरद पवार) विरोधी पक्षांवरच बहिष्कार टाकल्याचे चित्र अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला समोर आले. परंपरेनुसार अधिवेशनाच्या आदल्या दिवशी विरोधकांची पत्र परिषद झाली, पण या पत्रपरिषदेला राष्ट्रवादी (शरद पवार) चा एकही नेता उपस्थित नव्हता. त्यामुळे विरोधकांमध्ये समन्वयचा अभाव असल्याचे दिसून आले.
विरोधक हे मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकतात ही आता परंपराच झाली आहे, पण अधिवेशनासाठीची रणनीती ठरविण्यासाठी विरोधी पक्षांची जी बैठक शिवालय या उद्धवसेनेच्या मंत्रालयाजवळील कार्यालयात झाली त्यात राष्ट्रवादीचा (शरद पवार) एकही नेता उपस्थित नव्हता.
पत्रपरिषद सुरू होताच मित्र पक्षाचे नेते येणार आहेत, असे आ. भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले. मात्र पत्रपरिषद संपल्यानंतरही कोणी आलेच नाही.
एकोपा नसल्याचे चित्र
मविआत एकोपा नसल्याचे चित्र यानिमित्ताने समोर आले. काही असले तरी एकदोन आमदारांना प्रतीकात्मक म्हणून बैठकीला पाठविणे शक्य होते. तेही का टाळले गेले याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. राष्ट्रवादीचे (शरद पवार) विधानसभेत एकूण दहा आमदार आहेत.
विलीनीकरणाची चर्चा आता मागे राष्ट्रवादीच्या दोन गटांच्या पडली असली तरी ती त्या संदर्भातील शक्यता अद्याप संपुष्टात आलेली नाही. विलीनीकरण होईल आणि एकत्रित राष्ट्रवादी भाजपसोबत जाईल असा तर्कही दिला जात असताना आजचा 'बहिष्कार' चर्चेचा विषय ठरला आहे.
"आमचा पक्ष महाविकास आघाडीचाच घटक आहे. आम्ही तिन्ही पक्ष सोबत आहोत. आजच्या बैठकीत हजर राहण्याबाबत आमच्याकडूनच समन्वय होऊ शकला नाही, पण अधिवेशनात मविआचा आवाज एकत्रच राहील." -आ. शशिकांत शिंदे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी (शरद पवार गट)