ऑगस्टमध्ये अजित पवार मुख्यमंत्री होणार? परिवर्तन घडणार? NCPच्या आमदारांचे सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 18:23 IST2023-07-24T18:17:46+5:302023-07-24T18:23:45+5:30
NCP Ajit Pawar Group News: राज्यात राजकीय परिवर्तन झाल्यामुळे विकासकामे होत आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले.

ऑगस्टमध्ये अजित पवार मुख्यमंत्री होणार? परिवर्तन घडणार? NCPच्या आमदारांचे सूचक विधान
NCP Ajit Pawar Group News: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. अलीकडेच अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी केली आणि शिंदे-फडणवीसांच्या सत्तेत सामील झाले. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांच्याकडे अर्थ खात्याचा पदभार देण्यात आला. यातच आता अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याचे दावे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील आमदार करताना पाहायला मिळत आहे. पैकी एका आमदाराने याबाबत सूचक विधान केले आहे.
अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यावरच सांगितले होते की, ते लवकरच मुख्यमंत्री बनतील. हे सांगणारा मी पहिला व्यक्ती होतो. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघे एकनाथ शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम करतील, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. तर, अजित पवार यांचे खंदे समर्थक असलेले आमदार अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्रामध्ये लवकरच अजित पर्व सुरू होईल, असे ट्विट केले होते. यानंतर आता अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांनी भाष्य केले आहे.
ऑगस्टमध्ये अजित पवार मुख्यमंत्री होणार?
अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील अशा प्रकारचे जे राजकीय दावे केले जात आहेत, त्यावर धर्मरावबाब अत्राम म्हणाले की, आता ते होईल तेव्हा होईल. ऑगस्ट महिन्यात काही परिवर्तन घडेल का? असे विचारले असता, तसे झाले तर चांगलेच आहे. परंतु सध्या जे सरकार अस्तित्वात आहे ते चांगले आहे. भविष्यात काही घडामोडी घडतील की नाही, ते सांगू शकत नाही, असे अत्राम यांनी सांगितले.
दरम्यान, आधीच्या सरकारच्या काळात आमदारांच्या निधीचे काम सुरू होते. मोठी अडचण नव्हती, परंतु काही स्थगित्या होत्या. आता सगळे सुरळीत झाले आहे. आताची परिस्थिती वेगळी आहे. कारण आता राज्यात राजकीय परिवर्तन झाले आहे. निधी येतोय, त्यामुळे विकासकामे होत आहेत, असे अत्राम यांनी म्हटले आहे.