खळबळजनक दावा! अजितदादा अन् आणखी एका बड्या नेत्याच्या फोटोवर भोंदू खरातनं फुल्या मारल्या होत्या?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 19:16 IST2026-03-31T19:12:03+5:302026-03-31T19:16:08+5:30
हे प्रकरण जेवढं भयावह आहे तेवढंच महाराष्ट्राच्या भविष्यालाही घातक आहे. त्यामुळं या भोंदूबाबाच्या माध्यमातून जादूटोणा करणाऱ्या अंधभक्तांचे खरे चेहरे समोर यायलाच हवेत अशी मागणी रोहित पवारांनी केली.

खळबळजनक दावा! अजितदादा अन् आणखी एका बड्या नेत्याच्या फोटोवर भोंदू खरातनं फुल्या मारल्या होत्या?
मुंबई - बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर आमदार रोहित पवारांनी सातत्याने या अपघाताविषयी शंका उपस्थित केली आहे. त्यात नाशिकच्या भोंदू खरातचे प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण तापले. खरात प्रकरणाचे अजित पवारांच्या अपघाताशी कनेक्शन असल्याचा संशय आमदार अमोल मिटकरींनी व्यक्त केला होता. त्यानंतर आता आमदार रोहित पवारांनी खरात प्रकरणावर खळबळजनक दावा केला आहे. अजितदादा यांच्यासह महाराष्ट्रातल्या एका अत्यंत बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्या मारण्यात आल्याचं समजतंय असं रोहित पवारांनी ट्विट केलं आहे.
रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, जादूटोणासारख्या अंधश्रद्धांना महाराष्ट्र कधीही भीक घालत नाही परंतु जादूटोणा करणाऱ्या कलुषित मनोवृत्तींचा हेतू दुर्लक्षून चालणार नाही. भोंदू अशोक खरात याच्याकडे फोटोवर फुल्या मारण्याची पद्धत होती. त्यानुसार अजितदादा यांच्यासह महाराष्ट्रातल्या एका अत्यंत बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्या मारण्यात आल्याचं समजतंय. या भोंदू खरातने कुणाच्या सांगण्यावरून फोटोवर फुल्या मारण्याचा जादूटोणा केला? ज्यांच्या सांगण्यावरून जादूटोणा केला त्यांचा हेतू काय होता? हेही समोर येणं गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलं.
तसेच डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या महाराष्ट्रात कर्तृत्वापेक्षा आणि जनतेच्या कामांपेक्षा असल्या भोंदूगिरीवर विश्वास ठेवला जात असेल तर पुढच्या पिढीला काय संदेश जाणार आहे? हे प्रकरण जेवढं भयावह आहे तेवढंच महाराष्ट्राच्या भविष्यालाही घातक आहे. त्यामुळं या भोंदूबाबाच्या माध्यमातून जादूटोणा करणाऱ्या अंधभक्तांचे खरे चेहरे समोर यायलाच हवेत. खूप काही जणांची खूप काही माहिती असलेल्या भोंदू खरातचे धागेदोरे मोठमोठ्या नेत्यांपर्यंत येऊन पोहचल्याने आत्महत्या किंवा इतर काही दाखवून खरातला संपवायचं तर दुसरीकडं अजितदादांच्या अपघाताची इत्तंभूत माहिती असलेल्या व्ही के सिंगला काहीही झालं तरी वाचवायचं अशा चर्चा आहेत असंही रोहित पवारांनी सांगितले.
जादूटोणासारख्या अंधश्रद्धांना महाराष्ट्र कधीही भीक घालत नाही परंतु जादूटोणा करणाऱ्या कलुषित मनोवृत्तींचा हेतू दुर्लक्षून चालणार नाही. भोंदू अशोक खरात याच्याकडे फोटोवर फुल्या मारण्याची पद्धत होती. त्यानुसार अजितदादा यांच्यासह महाराष्ट्रातल्या एका अत्यंत बड्या नेत्याच्या फोटोवर…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 31, 2026
दरम्यान, दोषींना शिक्षा झालीच पाहिजे पण सत्य दडपण्यासाठी कोणाचा जीव घेतला जात असेल किंवा सत्य दडपण्यासाठी कोणाला दोषातून वाचवलं जात असेल तर या दोन्ही बाबी योग्य नाहीत. अशी राजकीय रणनीती कुणी आखत असेल तर महाराष्ट्राच्या जनतेला हे अजिबात आवडणार तर नाहीच उलट लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास उडेल. सत्य लपवण्यासाठी एवढा अट्टहास का? अशाने सत्य लपणार आहे का? कितीही प्रयत्न केला तरी सत्य लपवता येत नाही, ते कधीतरी बाहेर येतंच’ याचा अनेकांना विसर पडलेला दिसतोय असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला आहे.