अजितदादांनी 'बच्चा' म्हणत डिवचलं; रोहित पवारांकडून दोन वाक्यांत सडेतोड प्रत्युत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 20:50 IST2024-01-06T20:49:05+5:302024-01-06T20:50:52+5:30

काका अजित पवारांनी डिवचल्यानंतर आता रोहित पवार यांनी पुन्हा एकदा जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

ncp mla hits back to dycm ajit pawar x post goes viral | अजितदादांनी 'बच्चा' म्हणत डिवचलं; रोहित पवारांकडून दोन वाक्यांत सडेतोड प्रत्युत्तर!

अजितदादांनी 'बच्चा' म्हणत डिवचलं; रोहित पवारांकडून दोन वाक्यांत सडेतोड प्रत्युत्तर!

Rohit Pawar On Ajit Pawar ( Marathi News ) : महाराष्ट्राला काका-पुतण्यामधील राजकीय संघर्ष नवा नाही. मतभेद झाल्यानंतर नात्यातील व्यक्तीही एकमेकांविरोधात उभे ठाकल्याची अनेक उदाहरणे राज्याने पाहिली आहेत. राष्ट्रवादीतील फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या रुपाने महाराष्ट्रात काका-पुतण्या संघर्षाचा नवा अंक पाहायला मिळत आहे. ईडीने कारखान्यांवर केलेल्या कारवाईनंतर रोहित पवार यांनी अप्रत्यक्षरित्या अजित पवारांवर निशाणा साधला होता. या टीकेला प्रत्युत्तर देताना अजित पवार यांनी रोहित पवारांचा 'बच्चा' असा उल्लेख केला. काका अजित पवारांनी डिवचल्यानंतर आता रोहित पवार यांनी पुन्हा एकदा जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

अजित पवारांच्या टीकेला हटके स्टाइलमध्ये उत्तर देताना रोहित पवार यांनी "बच्चा है पर मन का सच्चा है! दिल है साफ, नफरत से है दूर" अशा कॅप्शनसह एक हिंदी गाणं शेअर केलं आहे. रोहित पवार यांनी पुन्हा अप्रत्यक्षपणे लक्ष्य केल्यानंतर अजित पवारही आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे.

रोहित पवार Vs अजित पवार संघर्ष; नेमकं काय घडलं?

रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो या कंपनीशी संबंधित ठिकाणांवर काल ईडीने छापे टाकले. राजकीय सूडबुद्धीतून ही कारवाई करण्यात आल्याचं सांगत रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेतून आज आपली बाजू मांडली. तसंच भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटावर टीकास्त्र सोडलं. मी चुकीचं काम केलं असतं तर अजितदादांसोबत भाजपबरोबर गेलो असतो, असं रोहित पवार म्हणाले. त्यांच्या या टीकेबाबत प्रश्न विचारताच "तो अजून बच्चा आहे. त्याच्या टीकेला उत्तर द्यावं एवढा रोहित मोठा झालेला नाही. त्यावर माझे कार्यकर्ते आणि प्रवक्ते बोलतील," असा टोला अजित पवारांनी लगावला होता.

Web Title: ncp mla hits back to dycm ajit pawar x post goes viral