यदु जोशी,लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि शरद पवार गट हे अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर विलीन होतील असे बोलले जात असताना तीनच दिवसांत दोन्ही गट विलीनीकरणाच्या मुद्यावरून एकमेकांवर कुरघोडी करीत असल्याचे चित्र समोर आले.
विलीनीकरणाबाबत थेट शरद पवार आणि अजित पवार यांची बैठकच झालेली नव्हती, या दाव्याला छेद देणारा एक व्हिडीओ शनिवारी चॅनेल्सकडे पोहोचविण्यात आला. त्यात शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, राजेश टोपे, हर्षवर्धन पाटील, खा. डॉ. अमोल कोल्हे, शशिकांत शिंदे, आ. रोहित पवार हे नेते दिसत आहेत. ही केवळ व्हिडीओ क्लिप आहे आणि त्यात ऑडिओ नाही. त्यामुळे चर्चा नेमकी कोणत्या विषयावर सुरू होती हे कळत नाही.
१७ जानेवारीची बैठक
खात्रीलायक सूत्रांनी सांगितले की, शरद पवार गटाच्या मुंबईतील एका महिला नेत्याने विलीनीकरणाच्या कथित चर्चेबाबतचा तो व्हिडीओ शनिवारी सकाळी चॅनेल्सकडे पोहोचविला. विलीनीकरणाबाबत शरद पवार आणि अजित पवार यांच्या समक्षच चर्चा झाली होती हे सिद्ध करण्याचा प्रयत्न त्यातून करण्यात आला. विलीनीकरण ही अजितदादांचीच इच्छा होती आणि आता त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते विलीनीकरणाला खो देत असल्याचा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न या निमित्ताने करण्यात आला. १७ जानेवारी रोजी बारामती येथे ही बैठक झाली होती.
विरोध भाजपचा की विशिष्ट नेत्यांचा?
राजकीय जाणकारांच्या मते विलीनीकरणास भाजपच्या राज्य आणि केंद्रातील नेत्यांचाही विरोध असल्याचे आता बोलले जात आहे. विलीनीकरणास भाजप अनुकूल असता तर आधी विलीनीकरणाची प्रक्रिया करा आणि नंतरच सुनेत्रा पवार याचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी करू, अशी भूमिका भाजपकडून घेतली गेली असती, पण त्याऐवजी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी लवकरात लवकर करण्याचा अजित पवार गटाकडून आलेला प्रस्ताव भाजपने तातडीने स्वीकारला. शरद पवार गटातील एका ज्येष्ठ नेत्याने लोकमतशी बोलताना दावा केला की, अजित पवार गटातील दोनतीन बडे नेते विलीनीकरणाच्या विरोधात आहेत, म्हणूनच ते रखडले.
तटकरेंचे म्हणणे वेगळे: या व्हिडीओबाबत अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष
खा. सुनील तटकरे यांनी माध्यमांना सांगितले की, बारामतीतील कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो होतो, तेव्हा चहापान करतानाचा तो व्हिडीओ आहे. त्यानंतर खुद्द अजित पवार यांनी लगेच स्पष्ट केले होते की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढण्याबाबत तेव्हा चर्चा झाली होती. मात्र, विलीनीकरणाबाबत बोलणे झाले नव्हते.
Web Summary : Instead of merging, NCP's Pawar factions are vying for dominance. A video surfaced, suggesting merger talks occurred, countered by claims of discussions only on local elections. Internal opposition within both groups and BJP's reluctance stall any potential union.
Web Summary : विलय के बजाय, एनसीपी के पवार गुट वर्चस्व के लिए होड़ कर रहे हैं। एक वीडियो सामने आया, जिसमें विलय वार्ता का सुझाव दिया गया, जिसका खंडन स्थानीय चुनावों पर चर्चा के दावों से किया गया। दोनों समूहों और भाजपा की अनिच्छा के भीतर आंतरिक विरोध संभावित मिलन को रोकता है।