“पंकजा मुंडेंना डावलण्यात आलं, खडसेंचंही तेच झालं; याचा परिणाम…,” छगन भुजबळ यांचं सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 15:15 IST2022-06-08T14:54:21+5:302022-06-08T15:15:23+5:30
२० जून रोजी राज्यातील विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणुक होईल. यासाठी भाजपने आपल्या ५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

“पंकजा मुंडेंना डावलण्यात आलं, खडसेंचंही तेच झालं; याचा परिणाम…,” छगन भुजबळ यांचं सूचक विधान
सध्या राज्यात राज्यसभा निवडणुकीची चुरस सुरू आहे. येत्या १० जून रोजी राज्यसभा निवडणूक होत आहे. त्यानंतर २० जून रोजी राज्यातील विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणुक होईल. यासाठी भाजपने आपल्या ५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपकडून यंदा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे राज्य सरचिटणीस श्रीकांत भारतीय, माजी मंत्री राम शिंदे, महिला आघाडीच्या अध्यक्षा उमा खरे आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांना यावेळी विधान परिषदेवर संधी मिळेल अशा चर्चा सुरू होत्या. परंतु त्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“पंकजा मुंडे यांचे स्टेटमेंट वाचले होते.. दिलेल्या संधीचं सोनं करेन. परंतु त्यांना डावलण्यात आले आहे. त्यांना पहिल्या क्रमांकावर उतरता आलं असतं. संधी द्यायला हवी होती. खडसेंच्या बाबतीत तेच झालं होतं. पंकजा मुंडे यांना परत घेतलं जाईल वाटलं होतं. परंतु असं काही झालं नाही. याचा परिणाम हा लोकांवर व समाजावरही होत असतो,” असं सूचक विधान छगन भुजबळ यांनी केलं.
आमदार प्रामाणिक राहतील याची खात्री
“भाजपने राज्यसभा निवडणुकीत जास्त उमेदवार दिला. मात्र आघाडीचे उमेदवार निवडून येतील. आता विधान परिषदेच्या निवडणुकीतही तयारी करावी लागेल, कंबर कसावी लागेल. महाविकास आघाडीचे उमेदवार राज्यसभेवर सर्व निवडून येतीलच आणि त्याच पावलावर पाऊल टाकून विधान परिषदेतही आघाडीचे उमेदवार निवडून येतील,” असा विश्वास त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. राज्यसभा असो या विधान परिषद असो यातील घोडेबाजाराला कोण बळी पडणार नाही. आमचे सर्व आमदार प्रामाणिक राहणार असल्याची खात्रीही त्यांनी व्यक्त केली.
कोणत्याही धर्मगुरूविरोधात बोलू नये
कुठल्याही धर्मगुरूविरुध्द बोललं जाऊ नये. अपमानकारक बोललं जाऊ नये. प्रत्येक धर्माचा आदर राखला गेला पाहिजे. हे आपल्या संविधानात लिहिले आहे. आता जे कुणी धमक्या देत आहेत त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की, हे भारताने केलेले नाही. हे भारतातील एका पक्षाच्या कार्यकर्त्याने केले आहे. त्याची शिक्षा इतर भारतीयांना नको. एखाद्या पक्षात असे माथेफिरू लोक असतात केवळ प्रसिद्धी मिळावी त्यासाठी काहीजण करत असतात. त्या नुपुर म्हणजे भारत नव्हे... त्या एका पक्षाच्या लहान प्रवक्ता आहेत. त्यांच्यावर पक्षाने कारवाई केली आहे. त्यामुळे अरब इस्लामिक देशातील लोक सहकार्य करतील असेही छगन भुजबळ म्हणाले.