“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 18:04 IST2025-12-13T18:02:26+5:302025-12-13T18:04:50+5:30
Deputy CM Ajit Pawar News: महापालिका निवडणुकांमध्ये महायुती म्हणून तीनही पक्ष एकत्र लढणार का, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असल्याचे म्हटले जात आहे.

“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
Deputy CM Ajit Pawar News: मुंबईसह राज्यातील पालिका निवडणुकीबाबत शिंदेसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. शिंदेसेना आणि भाजपने एकत्रितपणे महापालिका निवडणूक लढण्याबाबत या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. नवाब मलिक यांना निवडणूक प्रक्रियेत सक्रीय सामील केल्यामुळे अजित पवार गटासोबत न जाण्याची भूमिका भाजपाने घेतली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, महायुतीला धक्का लागेल, असे कोणतेही वक्तव्य कधीही केलेले नाही. महायुतीतील तीनही पक्षांमधील नेते आपली मते व भूमिका मांडत असतात. निवडणुतील युतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मी एकत्र बसून निर्णय घेऊ. महापालिका निवडणुका पुढील आठवड्यात जाहीर होतील, अशी अपेक्षा आहे. युतीने निवडणूक लढविण्याबाबत अद्याप आमच्यात चर्चा झालेली नाही, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
कट्टर हिंदुत्ववादी शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय गंमतीचा होता
राज्यात सध्या विधानसभा व विधानपरिषदेत विरोधी पक्ष नेता नाही आणि त्यावरून वाद सुरू आहे, याबाबत विचारता दहा टक्के सदस्य नसल्याने लोकसभेतही गेल्या कार्यकाळात विरोधी पक्ष नेता नव्हता. पण हा अधिकार अध्यक्ष व सभापतींचा आहे. तसेच आम्ही भाजपबरोबर गेलो, याबाबत आक्षेप घेतला जातो. पण कट्टर हिंदुत्ववादी शिवसेनेबरोबर जाण्याचा निर्णय हा गंमतीचा होता. भाजप-शिवसेना युती असताना राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेण्याचा प्रस्ताव आला होता. त्यावेळी शिवसेना असल्याने भाजपबरोबर न जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आम्ही १९७८ मध्ये पुलोद सरकारमध्ये होतो, असे अजित पवार यांनी सांगितले.
दरम्यान, रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यातील वाद आता थांबायला हवा. मंत्री उदय सामंत व आदिती तटकरे यांच्याशी चर्चा केली आहे. आतापर्यंत खूपच ताणले गेले आहे. आता त्यांच्यातील वाद थांबायला हवा, अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली.