शरद पवारांकडून नाशिक दौरा अचानक रद्द; उद्या १६ मंत्र्यांची महत्त्वाची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2020 12:42 IST2020-02-16T12:21:57+5:302020-02-16T12:42:48+5:30

शरद पवार हेलिकॉप्टरनं मुंबईला रवाना; नाशिकमधले नियोजित कार्यक्रम रद्द

ncp chief sharad pawar cancels nashik visit calls ministers meeting tomorrow | शरद पवारांकडून नाशिक दौरा अचानक रद्द; उद्या १६ मंत्र्यांची महत्त्वाची बैठक

शरद पवारांकडून नाशिक दौरा अचानक रद्द; उद्या १६ मंत्र्यांची महत्त्वाची बैठक

नाशिक: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिक दौरा रद्द केला आहे. नाशिक दौरा रद्द करुन शरद पवार मुंबईकडे रवाना झाले आहेत. उद्या त्यांनी राष्ट्रवादीच्या १६ मंत्र्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या तपासावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यातले मतभेद समोर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी मंत्र्यांची बैठक बोलावल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. 

राज्यातील वकिलांच्या परिषदेच्या समारोप कार्यक्रमासाठी शरद पवार नाशिकमध्ये येणार होते. सकाळी 11 वाजता ते राष्ट्रवादी भवनात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीदेखील घेणार होते. त्यामुळे कार्यकर्ते मोठ्या संख्येने भवनात जमले होते. मात्र जळगावमधून खास हेलिकॉप्टरनं ते नाशिक शहराजवळील आडगावमधल्या भुजबळ नॉलेज सिटीच्या हेलिपॅडवर आले. इथूनच ते हेलिकॉप्टरनं त्वरित मुंबईकडे रवाना झाले.

शरद पवार यांनी उद्या राष्ट्रवादीच्या १६ मंत्र्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. एल्गार प्रकरणाच्या तपासावरुन महाविकास आघाडी सरकारमधले मतभेद समोर येत असताना पवारांनी ही बैठक बोलावली आहे. राराज्य सरकारनं एसआयटीच्या माध्यमातून एल्गार प्रकरणाचा तपास करावा, अशी मागणी शरद पवार यांनी पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे केली होती. यानंतर अवघ्या काही तासांमध्ये केंद्रानं हा तपास एनआयएकडे सोपवला.

एल्गारचा तपास राज्य सरकारनं करावा, अशी आग्रही मागणी शरद पवार करत असताना मुख्यमंत्र्यांनी हा तपास एनआयएकडे सोपवण्यास परवानगी दिली. याबद्दल पवारांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. केंद्राचा निर्णय अयोग्य असून मुख्यमंत्र्यांचा निर्णय त्याहून अयोग्य असल्याचं पवार म्हणाले होते. यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एल्गार प्रकरणाचा समांतर तपास करण्याचे संकेत दिले. याबद्दल कायदेशीर सल्ला घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. 
 

Web Title: ncp chief sharad pawar cancels nashik visit calls ministers meeting tomorrow