नाराज छगन भुजबळ यांच्या मनधरणीसाठी हालचालींना वेग; सुनील तटकरे लवकरच घेणार भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 11:42 IST2025-01-04T11:42:07+5:302025-01-04T11:42:18+5:30
NCP AP Group Sunil Tatkare News: एक ते दोन दिवसांत छगन भुजबळ यांच्याशी चर्चा होणे अपेक्षित आहे. नाराजी दूर होईल, असा ठाम विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.

नाराज छगन भुजबळ यांच्या मनधरणीसाठी हालचालींना वेग; सुनील तटकरे लवकरच घेणार भेट
NCP AP Group Sunil Tatkare News: २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावेळी चांगलेच मानापमान नाट्य रंगल्याचे पाहायला मिळाले. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली. तसेच अजित पवार यांच्यावर सडकून टीकाही केली. अशातच छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. यानंतर आता छगन भुजबळ यांच्या मनधरणीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू असून, हालचालींना वेग आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार सुनील तटकरे यांनी याबाबत माहिती दिली.
मीडियाशी बोलताना सुनील तटकरे यांनी छगन भुजबळ यांच्या नाराजीबाबत भाष्य केले. दिल्लीत असतानाही यासंदर्भात बोललो आहे, वेळोवेळी बोललो आहे. नंतरच्या कालावधीमध्ये छगन भुजबळ परदेश दौऱ्यावर गेले. माझ्या माहितीप्रमाणे ते मायदेशात परतले आहेत. मी पण गेले पाच ते सहा दिवस रायगड-रत्नागिरीच्या दौऱ्यावर होतो. संघटनेची बैठकही घेतली. त्यामुळे आता एक ते दोन दिवसांत छगन भुजबळ यांच्याशी चर्चा होणे अपेक्षित आहे. नाराजी दूर होईलच, असा ठाम विश्वास सुनील तटकरे यांनी बोलून दाखवला.
पाच वर्षांचा रोडमॅप प्रदेशाध्यक्ष म्हणून तयार करणार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिनांक १८ व १९ जानेवारी रोजी अडीचशे निमंत्रितांसाठी दोन दिवसीय शिबीर छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आल्याची माहितीही तटकरे यांनी दिली. या शिबिरात विद्यमान खासदार, विद्यमान आमदार, माजी खासदार, आमदार, विधानसभा लढलेले सर्व उमेदवार, फ्रंटल सेलचे प्रमुख व इतर सेलचे प्रमुख आणि विशेष निमंत्रित असणार आहेत. या शिबिरात पाच वर्षांचा रोडमॅप प्रदेशाध्यक्ष म्हणून तयार करणार असल्याचे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, विधानसभेत आम्हाला ४१ जागांवर यश मिळाले. स्ट्राईक रेट दुसर्या क्रमांकावर राहिला आहे. पण पक्षाचा विस्तार राज्यभर करायचा आहे. सभासद नोंदणी मोहीम याच महिन्यात सुरू केली जाणार आहे. त्यानंतर संघटनात्मक कामाला गती द्यायची आहे. पक्षाचे काम फक्त राष्ट्रीय स्थितीपर्यंत मर्यादित न रहाता समाजाच्या विविध क्षेत्रांशी निगडित असलेल्या बाबींवर लक्ष केंद्रित करत पक्षाची वाटचाल पुढच्या कालावधीत अधिक मजबूतीने कशी करता येईल यादृष्टीने विचार करणार आहोत, असेही तटकरे म्हणाले.