“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 08:19 IST2025-11-06T08:19:28+5:302025-11-06T08:19:28+5:30
NCP Ajit Pawar Group Sunil Tatkare News: विरोधकांची भूमिका बजावताना टीका करावी लागते. आपले दुकान लोकांमध्ये चालवायचे असेल तर असे शब्दप्रयोग केले पाहिजे, असा पलटवार सुनील तटकरे यांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून केला.

“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
NCP Ajit Pawar Group Sunil Tatkare News: तळागाळातील राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता या निवडणुकीला सज्ज झाला असून, आता राज्य व जिल्हा स्तरावर महायुती म्हणून सामोरे जात असताना, कशा पद्धतीने सामोरे जायचे, हे ठरवायचे आहे. यासंदर्भात पुढील तीन दिवसात चर्चा होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दिली.
कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात उत्साह पहायला मिळत आहे. प्रत्येक जिल्ह्यातील कार्यक्षेत्रातून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते. ती माहिती सर्वांनी सादर केली. भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची आणि माझी चर्चा झाली. त्यामुळे येत्या समन्वय समितीची बैठक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत आम्ही ज्या भावना जिल्ह्याने मांडल्या त्या मला ज्ञात आहेत. शिवाय भाजपा-शिवसेनाच्या बैठका झाल्या. त्यांच्या नेत्यांना त्या ज्ञात आहेत. आम्ही नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्या, त्या महायुती म्हणून ठरवणार आहोत, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली.
रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस 'वेट अॅण्ड वॉच' च्या भूमिकेत
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांमध्ये प्रत्येक जिल्ह्यात जी काही राजकीय समीकरणे आहेत, ती समजून घेत आहोत. जाहीर झालेल्या निवडणुकीनंतर पक्षाचे कार्यकर्ते निवडणुकीच्या मोडवर गेले आहेत, असे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले. शिवसेनेने जाहीरपणे रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर युती नको, असे त्यांच्या तिन्ही आमदारांनी आणि जिल्हाप्रमुखांनी मत व्यक्त केले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने कधीही जाहीरपणे याबद्दल मत व्यक्त केलेले नाही आणि कधी केलेही नव्हते. अजित पवार यांच्यासमोर रायगड जिल्हाध्यक्षांनी याबद्दल सर्व माहिती दिली. ही वस्तुस्थिती खरी आहे. आम्ही रायगडमध्ये बायकॉट करण्याचा संबंधच नाही. शिवसेनेने गेले काही दिवस स्वच्छपणाची भूमिका रायगड जिल्ह्यात मांडलेली आहे. त्याची माहिती जिल्हाध्यक्षांनी आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांना दिली आहे. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस 'वेट अॅण्ड वॉच' च्या भूमिकेत आहे. योग्यवेळी योग्य निर्णय होईल, असे सुनील तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले. भाजपा आणि शिवसेनेसोबत वेगवेगळ्या पातळीवर संवाद सुरू आहेच. रायगड पुरते बोलायचे झाले तर रायगडमध्ये शिवसेनाच राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर बोलणार नाही अशी उघड भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीने त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे सुनील तटकरे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.
दरम्यान, उद्धव ठाकरे हे हल्ली फिरत असताना वेगवेगळे शब्दप्रयोग करून विनोद करायला लागले आहेत. शेवटी विरोधकांची भूमिका बजावताना या टीका टिपण्णी कराव्या लागतात. नाही तर विरोधकांचे दुकान कसे चालणार. आपले दुकान लोकांमध्ये चालवायचे असेल तर असे शब्दप्रयोग केले पाहिजे. टीआरपी मिळवायला लागतो. त्यामुळे त्यांच्याकडून तशी टीका टिपण्णी स्वाभाविकच आहे. उद्धव ठाकरे दीर्घकाळ राजकारणात आहेत. त्यामुळे या निवडणूकांना सामोरे जात असताना त्यांना एनडीए आणि महायुतीवर शाब्दिक प्रहार करावे लागणार. नाही तर त्यांचे तसे बाकीचे कार्यक्रम काहीच नाही. महायुतीमध्ये काय आहे यावर प्रकर्षाने बोलणे या आधारित मतदारांना आकर्षित करणे हा एकमेव त्यांचा अजेंडा आहे, असा टोला सुनील तटकरे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.