Nashik: मालेगावी आणखी साडेपाच लाखांच्या बनावट नोटा जप्त, वर्ध्यातून आलेल्या दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 11:21 IST2025-11-16T11:20:07+5:302025-11-16T11:21:56+5:30
Nashik Fake Notes Seized: पंधरा दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातून येणाऱ्या बनावट नोटांप्रकरणी टोळी जेरबंद केल्याची घटना ताजी असतानाच किल्ला पोलिसांनी पुन्हा एक बनावट नोटांचे रॅकेट उघड केले.

Nashik: मालेगावी आणखी साडेपाच लाखांच्या बनावट नोटा जप्त, वर्ध्यातून आलेल्या दोघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (नाशिक): पंधरा दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातून येणाऱ्या बनावट नोटांप्रकरणी टोळी जेरबंद केल्याची घटना ताजी असतानाच किल्ला पोलिसांनी पुन्हा एक बनावट नोटांचे रॅकेट उघड केले आहे. शनिवारी (दि. १५) पहाटे केलेल्या कारवाईत साडेपाच लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या असून, या प्रकरणी वर्धा जिल्ह्यातील दोघांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी शहरातील तांबा काटा भाग व परिसरात सापळा रचला असता शनिवारी पहाटे दीडच्या सुमारास पोलिसांना धनराम नारायण धोटे (२०, रा. मु.पो. कानगाव, ता. हिंगणघाट, जि. वर्धा) व राहुल कृष्णराव आंबटकर (२५, रा. कारला चौक, सावनी नगर, जि. वर्धा) हे दोघे संशयितरीत्या फिरताना आढळले.
पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत सामानाची तपासणी केली असता धोटे यांच्या सॅकमध्ये २ लाख ७६ हजारांच्या ५०० रुपयांच्या ५५२ बनावट नोटा व २ लाख ६७ हजार ५०० रुपयांच्या पाचशे रुपयांच्या ५३५ नोटा अशा एकूण ५ लाख ४३ हजार ५०० रुपयांच्या १ हजार ८७ बनावट नोटा आढळल्या. तसेच धोटे याच्या पॅन्टच्या खिशातून १३ हजारांच्या खऱ्या नोटा आढळल्या.
१० दिवस पोलिस कोठडी
किल्ला पोलिसांनी साडेपाच लाखांच्या बनावट नोटांसह दोघांना शनिवारी (दि. १५) पहाटे ताब्यात घेतले. या दोघांना शनिवारी स्थानिक न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीशांनी दोघांनाही २४ नोव्हेंबरपर्यंत म्हणजे १० दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
भाड्याच्या खोलीत सुरू होती नोटांची छापाई
वर्ध्यातील गोंड प्लॉट परिसरात असलेल्या एका डॉक्टरच्या घरातील तिसऱ्या माळ्यावर किरायाच्या खोलीतून बनावट नोटांचा सुरू असलेला काळा बाजार पोलिसांनी उधळून लावला. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलास शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, मुख्य आरोपीच्या शोधार्थ पोलिस रवाना झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी ५०० रुपयांच्या १४४ बनावट नोटा, मोबाइल, प्रिंटरसह एकूण १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती दिली.