नार्वेकर म्हणाले, पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू; मंत्रिमंडळात फेरबदलाच्या दाव्यावर स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 11:59 IST2025-07-26T11:58:10+5:302025-07-26T11:59:36+5:30

 राज्य मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल होणार असल्याचा दावा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते  संजय राऊत  यांनी केला आहे. मंत्रिमंडळातील चार ते पाच मंत्र्यांना  डच्चू देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले आहेत.

Narvekar said, we will fulfill the responsibility given by the party; Clarification on the claim of cabinet reshuffle | नार्वेकर म्हणाले, पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू; मंत्रिमंडळात फेरबदलाच्या दाव्यावर स्पष्टीकरण

नार्वेकर म्हणाले, पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू; मंत्रिमंडळात फेरबदलाच्या दाव्यावर स्पष्टीकरण

मुंबई/पुणे : राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याची चर्चा असताना ‘विधानसभाध्यक्ष असो वा मंत्री किंवा आमदार म्हणून काम असो; शेवटी काम हे जनतेसाठीच करत राहायचे असते. मी माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवतो. त्यामुळे पक्ष मला जी जबाबदारी देईल ती मी पार पाडणार आहे. जी माझ्या पक्षाची इच्छा तीच माझी इच्छा,’ असे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. 

 राज्य मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल होणार असल्याचा दावा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते  संजय राऊत  यांनी केला आहे. मंत्रिमंडळातील चार ते पाच मंत्र्यांना  डच्चू देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले आहेत.  या पार्श्वभूमीवर सध्या भाजपमध्ये  नाराज असलेल्या माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभाध्यक्ष म्हणून  संधी देण्यात येणार असून, राहुल नार्वेकर यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. 

या पार्श्वभूमीवर शुक्रवारी  काळबादेवी ते गिरगावदरम्यान मेट्रोची तसेच तेथील मार्गाची पाहणी करताना नार्वेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मला कोणती जबाबदारी द्यायची याचा निर्णय पक्ष घेईल. मी माध्यमांतील  बातमीवर विश्वास ठेवत नाही. माझ्या पक्षाची जी इच्छा असेल ती माझी इच्छा राहील.  अध्यक्षपदावर राहून मी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत. मुंबई आणि नागपूर विधानभवनाचा चेहरामोहरा बदलतोय, अध्यक्ष म्हणून मी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला आहे.

अजित पवार म्हणाले, मंगळवारपर्यंत थांबा
अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झालेले छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे यांनी शुक्रवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात भेट घेतली. असंवेदनशील कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्या; अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी भेटीत दिला. त्यावर पवार यांनी घाडगे यांना मंगळवारपर्यंत थांबा, असे सांगितले.

...तर आनंद कसा होईल?
मंत्री झालात तर आपल्याला आनंद होईल काय, असे विचारताच नार्वेकर  म्हणाले, मंत्र्यांपेक्षा  विधानसभा अध्यक्षपद  हे वरचे पद आहे. त्यामुळे मंत्री झालो तर आनंद कसा होईल?   

धनंजय मुंडे यांना पुन्हा संधी देऊ
माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कृषी विभागातील गैरव्यवहारासंदर्भात आरोप करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांच्यावरील सर्व आरोप चुकीचे असल्याचा निर्वाळा दिला आहे. आणखी एका प्रकरणात त्यांची चौकशी सुरू आहे. यामध्ये त्यांचा संबंध नसल्यास पुन्हा मंत्रिपदाची संधी देऊ, असेही अजित पवार यांनी सांगितले.

आम्ही वाट पाहत आहोत ! 
कुणाचा राजीनामा घ्यायचा, कुणाचा नाही, हे मुख्यमंत्र्यांनी ठरवायचे आहे. मुख्यमंत्र्यांची सहनशीलता किती आहे आणि या सगळ्यासंदर्भात ते काय निर्णय घेतात, याची आम्ही वाट पाहात आहोत, असे शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी नागपुरात सांगितले.

Web Title: Narvekar said, we will fulfill the responsibility given by the party; Clarification on the claim of cabinet reshuffle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.