नरेंद्र मोदी लोकांची मनं जिंकलेले नेते; उदयनराजेंची स्तुतीसुमनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2019 22:18 IST2019-04-07T22:16:00+5:302019-04-07T22:18:36+5:30

खासदार उदयनराजेंकडून मोदींचं कौतुक

Narendra Modi has won the hearts of people says ncp mp Udayan Raje | नरेंद्र मोदी लोकांची मनं जिंकलेले नेते; उदयनराजेंची स्तुतीसुमनं

नरेंद्र मोदी लोकांची मनं जिंकलेले नेते; उदयनराजेंची स्तुतीसुमनं

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकांची मनं जिंकलेली नेते असल्याचे कौतुकोद्गार राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी काढले. 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उदयनराजेंनी विविध मुद्द्यांवर आणि व्यक्तींवर भाष्य केलं. राजकारणातील दिग्गजांबद्दल काय वाटतं, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी मोदींचं कौतुक केलं.
 
उदयनराजे यांना देशातील आणि राज्यातील विविध राजकारण्याविषयी काय वाटतं, असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आदर असल्याचं ते म्हणाले. त्यांनी लोकांची मनं जिंकली, असंदेखील त्यांनी सांगितलं. यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांबद्दल काय वाटतं, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनीदेखील लोकांची मनं जिंकल्याचं उदयनराजे म्हणाले. पुढे मोदींबद्दल हाच प्रश्न विचारताच उदयनराजेंनी तेच उत्तर दिलं. 'मोदींनीदेखील लोकांची मनं जिंकली. जे आहे ते आहे,' असं उदयनराजे म्हणाले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार माझे चांगले मित्र असल्याचं उदयनराजेंनी सांगितलं. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची पक्षाला राष्ट्रीय राजकारणात गरज असल्याचं ते म्हणाले. तर काँग्रेस अध्यक्ष चार्मिंग आणि हँडसम असून ते नक्कीच चांगलं काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींनी पक्षाला संकटात एकसंध ठेवण्याचं काम केल्याचे कौतुकोद्गार त्यांनी काढले. यावेळी त्यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवलेंना चिमटा काढला. मिर्झा गालिबनंतर कोण असतील, तर ते आठवले, असा टोला उदयनराजेंनी काढला. 
 

Web Title: Narendra Modi has won the hearts of people says ncp mp Udayan Raje