Nana Patole: 'देशात धर्मांध लोकांचे प्रस्थ वाढविण्याचा सत्ताधारी भाजपाचा प्रयत्न', नाना पटोलेंचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 16:33 IST2022-06-09T16:32:37+5:302022-06-09T16:33:23+5:30
Nana Patole Criticize BJP: विविधतेत एकता ही भारताची ओळख असून तीच ‘आयडिया ऑफ इंडिया’ आहे. काँग्रेसने धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करून देशाची अखंडता कायम ठेवली आहे मात्र, केंद्रातील भाजपाचे सरकार देशात धर्मांध लोकांचे प्रस्थ वाढविण्याचा प्रयत्न करत आहे.

Nana Patole: 'देशात धर्मांध लोकांचे प्रस्थ वाढविण्याचा सत्ताधारी भाजपाचा प्रयत्न', नाना पटोलेंचा घणाघात
मुंबई - विविधतेत एकता ही भारताची ओळख असून तीच ‘आयडिया ऑफ इंडिया’ आहे. काँग्रेसने धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करून देशाची अखंडता कायम ठेवली आहे मात्र, केंद्रातील भाजपाचे सरकार देशात धर्मांध लोकांचे प्रस्थ वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपाचे हे कुटील कारस्थान काँग्रेस कदापी पूर्ण होऊ देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.
यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, देशात जोपर्यंत सामाजिक स्थैर्य निर्माण होत नाही तोपर्यंत देशाची आर्थिक प्रगती होणार नाही असे राहुलजी गांधी सातत्याने सांगत आले आहेत. मात्र भारतीय जनता पक्ष समाजात द्वेष पसरवून अस्थिरता निर्माण करत आहे. धार्मिक मुद्यांना पुढे करून परिस्थिती बिघडवण्याचे काम होत असल्याने अर्थव्यवस्थेला ते मारक ठरत आहे. मागील ८ वर्षात देशाची अर्थव्यवस्था ढासळत आहे, रुपयाची घरसण होत आहे. जीडीपी घरसला, प्रत्येक क्षेत्राचा विकास मंदावला आणि महागाई मात्र प्रचंड वेगाने वाढत आहे. बेरोजगारी व महागाई वाढल्याने सर्व सामान्यांचे जगणे कठीण झाले आहे.
डोक्यावर स्वतःच्या हक्काचे छत असावे या भावनेतून सर्वसामान्य व्यक्ती घरासाठी कर्ज घेतो परंतु मोदी सरकारच्या काळात जनतेसाठी ‘पाण्यापेक्षा विष बरं’ अशी अवस्था झाली आहे. महागाई व ढासळत चाललेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात अर्ध्या टक्क्याची वाढ केल्याने सर्व प्रकारच्या कर्जांचे हप्ते वाढणार आहेत.
देशांतर्गत परिस्थिती बिकट झाली असताना जागतिक पातळीवरही आनंदी आनंदच दिसत आहे. भाजपाच्या काही वाचाळ प्रवक्त्यांमुळे भारताची जगात प्रतिमा डागाळली आहे. २० देशांनी भाजपा प्रवक्त्यांच्या विधानावर तीव्र नाराज व्यक्त करत भारताने माफी मागावी असे म्हटले आहे. पण भाजपाच्या चुकीसाठी देशाने माफी का मागावी? माफी भाजपाने मागावी. मोदी सरकारचे परराष्ट्र धोरण फेल झाले आहे. दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या परराष्ट्र धोरणामुळेच भारताला जगात प्रतिष्ठा लाभली आहे पण दुर्दैवाने भाजपा नेहरुंबद्दल अत्यंत हिन दर्जाची टीका करत असते.
काँग्रेसने कायम धर्मनिरपेक्षता जोपासली आहे आणि आजही त्यावरच वाटचाल सुरू आहे. विविध धर्म, संस्कृती, रूढी परंपरा असलेल्या भारत देशात केवळ काँग्रेसच अखंडता टिकवून ठेवू शकते. त्यामुळे काँग्रेस नेहमीच सर्व घटकांचा सन्मान करून सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करणार पक्ष असून काँग्रेसचा विचारच देशाला तारणारा आहे, असेही प्रदेशाध्यक्ष म्हणाले.