शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 19:59 IST2025-10-30T19:58:07+5:302025-10-30T19:59:50+5:30
मला मुख्यमंत्रिपद मिळाले पाहिजे. मला सत्ता मिळाली पाहिजे. जे समोर दिसेल ते मिळाले पाहिजे असं सांगत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील पर्यटन खाते काही गड किल्ल्यांवर नमो पर्यटन केंद्र उभारणार आहे. शासनाने काढलेल्या जीआरविरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवाय एकनाथ शिंदे यांच्याकडे हे खाते असल्याचे सांगत त्यांच्याविरोधातही राज ठाकरे यांनी जहरी टीका केली आहे.
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
मनसे मेळाव्यात राज ठाकरे म्हणाले की, आज काही वृत्तपत्रात एक बातमी आली आहे. शासनाने एक जीआर काढलाय. हा जीआर वाचला तर तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. एकनाथ शिंदे यांच्याकडे हे खाते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकार पर्यटन केंद्रे काढत आहेत. त्याला नमो पर्यटन केंद्र असे नाव दिले आहे. ही नमो पर्यटन केंद्रे शिवनेरी, रायगड, राजगड, प्रतापगडावर काढण्यात येत आहे. ज्याठिकाणी फक्त आमच्या महाराजांचे नाव असले पाहिजे तिथे ही नमो पर्यटने केंद्र उभारली जाणार आहेत. सत्ता असो, नसो, वर नाही, खाली नाही आजूबाजूला कुठेही नाही. ही पर्यटन केंद्र उभे केले की फोडून टाकणार असा इशारा त्यांनी दिला.
तसेच मला स्वत:ला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची? बरं हे वर पंतप्रधानांनाही माहिती नसेल, खाली काय चाटूगिरी चालू आहे..सत्ता डोक्यात गेली ना आम्ही वाट्टेल ते करू त्यातून हे डोक्यात येते. शिवाजी महाराजांचे गडकिल्ले असो नाहीतर दुसरे काही...मला मुख्यमंत्रिपद मिळाले पाहिजे. मला सत्ता मिळाली पाहिजे. जे समोर दिसेल ते मिळाले पाहिजे. यासाठी ज्यांना ज्यांना खुश करायचे असेल त्यांना खुश करावे लागेल. मुंबईतल्या जागा अदानीला द्यायच्या आहेत देऊन टाका..बोट ठेवेल तिथे जागा दिली जातेय. हे सगळं येते सत्तेतून आणि सत्ता ईव्हीएममधून आणली जाते असं सांगत राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात केला.
काय आहे सरकारची योजना?
पर्यटन स्थळांच्या ठिकाणी मुलभुत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत सन २०२५-२६ अन्वये राज्यातील ७५ पर्यटन स्थळी पर्यटकांसाठी आधुनिक मुलभुत सोयीसुविधायुक्त "नमो पर्यटन माहिती व सुविधा केंद्र" स्थापन करण्यात येणार आहे. त्याबाबत शासन निर्णय काढून प्रथम टप्यात किल्ले प्रतापगड, रायगड, शिवनेरी आणि साल्हेर या ठिकाणी केंद्र स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या ४ ठिकाणी "नमो पर्यटन माहिती व सुविधा केंद्र" उभारण्यासाठी सरकारने २० कोटी निधीला मान्यता दिली आहे.