Special Train: आज नागपूर-मुंबई आणि पुणे-नागपूर स्पेशल ट्रेन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 19:42 IST2025-10-23T19:12:01+5:302025-10-23T19:42:35+5:30
Mumbai- Nagpur Special Train: दिवाळी आणि छटपूजेसाठी येणाऱ्या- जाणाऱ्या नागरिकांची विविध मार्गावर वाढलेली प्रचंड गर्दी लक्षात घेऊन स्पेशल ट्रेन चालवल्या जात आहे.

Special Train: आज नागपूर-मुंबई आणि पुणे-नागपूर स्पेशल ट्रेन!
नागपूर: दिवाळी आणि छटपूजेसाठी येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांची विविध मार्गावर वाढलेली प्रचंड गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेने विविध विभागात वेगवेगळ्या मार्गावर स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर, आज २४ ऑक्टोबरला नागपूर ते मुंबई आणि पुणे-हडपसर ते नागपूर स्पेशल ट्रेन धावणार आहेत.
स्पेशल ट्रेन नंबर ०२१४० नागपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी नागपूर स्थानकावरून शुक्रवारी दुपारी १.३० वाजता सुटणार आहे. वर्धा, धामनगाव, बडनेरा, मुर्तीजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिक रोड तसेच कल्याण आणि ठाणे आदी ठिकाणी या गाडीचे थांबे राहणार आहे. या गाडीला तीन थर्ड एसी, १० स्लिपर, ५ सेकंड जनरल आणि २ सेकंड जनरल कोचसह गार्ड ब्रेक व्हॅन राहणार आहे.
त्याचप्रमाणे ट्रेन नंबर ०१२०२ हडपसर नागपूर ही स्पेशल ट्रेन हडपसर स्थानकावरून शुक्रवारी दुपारी ३.५० वाजता सुटणार आहे. मध्ये असलेल्या उरळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा रेल्वे स्थानकावर ही गाडी थांबेल. या गाडीला चार थर्ड एसी, ६ स्लिपर, ६ जनरल सेकंड आणि २ जनरल सेकंड कोचसह गार्ड ब्रेक व्हॅन राहणार आहे.
मुंबईला जाणाऱ्यांची तर पुण्याहून येणाऱ्याची गर्दी
दिवाळी आणि छटपूजेच्या सणाचे पर्व सुरू आहे. नागपूर विदर्भातील मंडळी मोठ्या संख्येने मुंबईला शिकण्यासाठी, रोजगारासाठी राहतात. त्यामुळे सध्या मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी विविध रेल्वे गाड्यांमध्ये दिसून येत आहे. त्याचप्रमाणे पुण्याहून नागपूर, विदर्भात येणाऱ्या प्रवाशांची गर्दीही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने शुक्रवारी २४ ऑक्टोबरला नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या तर, याच दिवशी पुण्याहून नागपूर, विदर्भात येणाऱ्या स्पेशल ट्रेनचे नियोजन केले आहे.