Sandeep Deshpande: माझी बायको आणि सहा वर्षांचा मुलगा घरी आहे... पोलिसांनो...; संदीप देशपांडेंचा Video आला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 20:19 IST2022-05-04T20:00:15+5:302022-05-04T20:19:45+5:30
Sandeep Deshpande Video Out After Police Action: आज सकाळी मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी पोलिसांना चकवून गाडीत बसून पोबारा केल्याने मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी या दोघांविरोधात आता ३५३ कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. यावर देशपांडे यांनी व्हिडीओ जारी करून पोलिसांना विनंतीवजा इशारा दिला आहे.

Sandeep Deshpande: माझी बायको आणि सहा वर्षांचा मुलगा घरी आहे... पोलिसांनो...; संदीप देशपांडेंचा Video आला
भोंग्यांवरून दिलेला अल्टीमेटम आज संपला असून मशीदींवरील भोंग्यांवर आपली भूमिका ठाम असल्याचे राज यांनी आजही स्पष्ट केले आहे. मनसेच्या नेत्यांची पोलिसांनी धरपकड सुरु केली आहे. यातच आज सकाळी मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी पोलिसांना चकवून गाडीत बसून पोबारा केल्याने मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी या दोघांविरोधात आता ३५३ कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. यावर देशपांडे यांनी व्हिडीओ जारी करून पोलिसांना विनंतीवजा इशारा दिला आहे.
VIDEO: पोलिसांना धक्काबुक्की केली? पळून गेले? संदीप देशपांडे 'त्या' घटनेवर पहिल्यांदाच बोलले
हा प्रकार राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर घडला होता. यामध्ये धुरी आणि देशपांडे यांना पोलीस त्यांच्याच गाडीत घालत होते. तसेच एक पोलीस अधिकारी त्या गाडीत बसत होता. परंतू, देशपांडे यांनी त्या पोलिसाला ढकलले आणि गाडीचा दरवाजा लावून घेत पलायन केले. यावर देशपांडे यांनी आपल्याला पीआयनी बाजुला चल बाजुला चल असे म्हटले. तेव्हा सात ते आठ पुरुष पोलिसांनी आम्हाला गराडा घातला होता. पत्रकारही वन टू वन करायची आहे असे म्हणत होते. त्या दबावामुळे आम्ही कारच्या दिशेने गेलो, तिथे महिला पोलिसाला स्पर्शही झाला नाही. पुरुषाला पकडण्यासाठी महिला पोलीस कधीही पुढे येत नाही. यामुळे आपल्यावर खोटेनाटे आरोप करत गुन्हे दाखल केले जात आहेत, असा आरोप देशपांडे यांनी केला आहे.
याचबरोबर महिला पोलिसाने देवाला स्मरून सांगावे की आम्ही धक्का मारला किंवा स्पर्श केला. नाहीतर दबावातून तिने तसे आरोप करावेत. आमचा कायद्यावर आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. राज ठाकरेंच्या सीसीटीव्हीत सगळे चित्रित झाले असेल. परंतू मी पोलिसांना एक गोष्ट सांगू इच्छितो मी पळून गेलेलो नाही. माझ्या घरी बायको आणि सहा वर्षांचा मुलगा असतात, इतरांच्या घरी जातात तसे पोलीस रात्री बेरात्री बारा वाजता तिथे जातील. मी घरी नाहीय, मी वकीलांचा सल्ला घेत आहे, हे लक्षात ठेवावे, असा विनंती वजा इशारा देशपांडे यांनी दिला आहे.