एप्रिलपासून 'माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव' अभियान, राज्य सरकारतर्फे गावांना रोख पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 06:45 IST2026-02-22T06:44:09+5:302026-02-22T06:45:52+5:30
अभियानात 'आरोग्यसंपन्न' ठरणाऱ्या गावाला रोख पुरस्कार देण्यात येईल. त्यासाठी ८०.७५ कोटींचा निधी देण्यात येणार आहे.

एप्रिलपासून 'माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव' अभियान, राज्य सरकारतर्फे गावांना रोख पुरस्कार
मुंबई : राज्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, रोगमुक्त व स्वयंपूर्ण करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने "माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव" या महत्त्वाकांक्षी अभियानास मंजुरी दिली आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून राबविण्यात येणारे हे अभियान १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
अभियानात 'आरोग्यसंपन्न' ठरणाऱ्या गावाला रोख पुरस्कार देण्यात येईल. त्यासाठी ८०.७५ कोटींचा निधी देण्यात येणार आहे. या लोकसहभागावर आधारित या उपक्रमाचा उद्देश गावपातळीवर नागरिकांचे आरोग्यमान उंचावणे, प्रतिबंधात्मक व प्रोत्साहनात्मक आरोग्य सेवांना चालना देणे आणि आरोग्यदायी जीवनशैली रुजवणे हा आहे.
उपचारांपेक्षा आजार होऊ नयेत, यावर विशेष भर देण्यात येणार असून, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी करणे, माता-बाल आरोग्य सुधारणे, पोषण, स्वच्छता, सुरक्षित पाणी, सांडपाणी व्यवस्थापन, जीवनशैलीजन्य आजारांचे नियंत्रण आणि मानसिक आरोग्य या बाबींचा समावेश मोहिमेत करण्यात आला आहे.
८०.७५ कोटींच्या निधीस मंजुरी
योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, विभाग, जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावर समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. अभियानाच्या निकषांनुसार गावांचे मूल्यमापन करण्यात येईल. एकूण गुणांपैकी ७० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या गावांना "आरोग्यसंपन्न गाव" म्हणून घोषित करून स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख पुरस्कार देण्यात येणार आहे. या अभियानासाठी सुमारे ८०.७५ कोटींच्या निधीस मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.