मनसे कार्यकर्त्याची हत्या, गुन्हेगाराला वाचवणारा 'आका' कोण?; जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 15:47 IST2025-01-25T15:47:14+5:302025-01-25T15:47:50+5:30
ठाण्यात मनसे पदाधिकारी जमील शेखची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येतील आरोपींना वाचवण्यासाठी ८ तासात पोलीस अधिकाऱ्याची बदली केली.

मनसे कार्यकर्त्याची हत्या, गुन्हेगाराला वाचवणारा 'आका' कोण?; जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट
मुंबई - ४ वर्षापूर्वी ठाण्यातील मनसे पदाधिकारी जमील शेख यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा आरोप राष्ट्रवादीचे तत्कालीन नगरसेवक नजीब मुल्ला यांच्यावर लावण्यात आला होता. आता या प्रकरणी माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांनी गौप्यस्फोट करून गुन्हेगाराला वाचवणारा आका या सरकारमधील मंत्रिमंडळात आहे असा गौप्यस्फोट केला आहे. आव्हाडांनी आज मुंबईतील मोर्चावेळी ठाण्यातील जमील शेख हत्या प्रकरणाला पुन्हा वाचा फोडली.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मंत्रिमंडळ अनेक आका आहेत. हत्येतील आरोपी सुटतो कसा? त्याला पोलीस पकडायला जातात त्या अधिकाऱ्यांची बदली कशी होते? त्या बदलीचा स्टेटस गुन्हेगाराने त्याच्या व्हॉट्सअपवर ठेवला होता. जमील शेख हत्या प्रकरणात एफआयआरमध्ये नाव असताना चार्जशीटमध्ये नाव घेतले नाही. तो खूनात नाही हे पोलिसांना सांगावे लागेल. एफआयआर असा रद्द करता येत नाही. त्यात नाव असताना तुम्ही चार्जशीटमध्ये साधा उल्लेखही करत नाही तो दोषी आहे की निर्दोष याचा अर्थ कसा घ्यायचा असा सवाल त्यांनी केला.
तसेच २०१४ साली असाच गुन्हा केला होता. ज्याला मारलं त्याने कोर्टात जबाब दिला होता. एफआयआरमध्ये नजीब मुल्ला यांचे नाव घेतले आहे. आमच्यासोबत तो होतो. FIR मध्ये नाव असताना चार्जशीटमध्ये नाव का घेत नाहीत. त्याच्याविरोधात पुरावा नाही हे चार्जशीटमध्ये लिहा. ज्याने सुपारी घेतली त्या गुन्हेगाराने ३ पेनड्राईव्ह पाठवले, त्याचे ४ झाले. कुठल्या आकाने फोन केला, पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी लखनौ, गोरखपूरपर्यंत केली होती. पहिला आरोपी पकडला त्याने नाव सांगितले, कुणाच्या सांगण्यावरून गोळी झाडली मात्र त्याच नितीन ठाकरेची बदली ८ तासांत केली असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला.
दरम्यान, हिंमत असेल तर त्याच्या हातात तपास द्या. नितीन ठाकरेची बदली झाल्यावर नजीब मुल्लाने स्टेटस ठेवले होते. एवढी हिंमत कुठून होते, ही मानसिकता, विकृती आहे. जमील शेखला त्यानेच २०१४ ला मारले होते. सगळ्या निवडणुका जिंकल्यानंतर मी हा विषय काढतो. त्या कुटुंबाने अनेकदा माझी भेट घेण्याचा प्रयत्न केला परंतु मी भेट नाकारली. कारण आपण राजकारण करतोय असा आरोप व्हायला नको. मी राजकारण करत नाही. मी त्या कुटुंबाच्या बाजूने बोलतोय. मला राजकारण करायचं असते तर निवडणुकीत वापर केला असता. FIR मध्ये नाव असेल तर पोलिसांना चार्जशीटमध्ये तो आरोपी आहे की नाही हे सांगावेच लागते असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.