'पालिका प्लॅन' ON ! सांगली, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 15:23 IST2025-07-10T15:20:39+5:302025-07-10T15:23:18+5:30

सांगली, मिरज, कुपवाडचा नगराध्यक्ष शिवसेनाच ठरवेल; उदय सामंत यांना विश्वास

Municipality Election Plan ON as Hundreds of workers from Sangli, Ratnagiri, Pune, Kolhapur join Eknath Shinde Shiv Sena | 'पालिका प्लॅन' ON ! सांगली, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

'पालिका प्लॅन' ON ! सांगली, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

सांगलीतील पाच माजी नगरसेवकांनी तसेच रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरमधील उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री सामंत यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्याला आमदार सुहास बाबर, शिवसेना सचिव राम रेपाळे, चंद्रहार पाटील हे लोकदेखील उपस्थित होते. सांगली जिल्ह्यात शिवसेना पक्ष मजबूत झाला असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सांगली मिरज कुपवाडचा नगराध्यक्ष शिवसेनाच ठरवेल, असा विश्वास शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.

"एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांचे नेतृत्व आहे. ग्रामीण भागातून मोठं झालेलं नेतृत्व असल्याने ते इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांना न्याय देतात. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकेंच्या आदेशाने अयोध्येत कारसेवेसाठी गेलेले सुरेश शेळके यांनीही आज मूळ शिवसेनेत प्रवेश केला. यातून बाळासाहेबांची शिवसेना एकनाथ शिंदेच पुढे घेऊन जात आहेत, यावर शिक्कामोर्तब झाले," असे मंत्री उदय सामंत म्हणाले.

कोणी-कोणी केला पक्षप्रवेश?

सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे काँग्रेस प्रदेश सचिव सागर वनखंडे, सांगली जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कांबळे, सचिव राज सोनार, माजी नगराध्यक्ष मोहनसिंग राजपूत, माजी नगरसेवक प्रकाश व्हनकडे, माजी नगरसेवक सुरेश शेळके, माजी नगरसेवक अश्विनी कांबळे, माजी नगरसेवक कल्लाप्पा कांबळे, माजी सभापती अनिता वनखंडे, माजी शिक्षण उपसभापती तानाजी व्हनकडे या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड विधानसभा अध्यक्ष मेघराज लोखंडे, रत्नागिरीमधील उबाठाच्या महिला संपर्क प्रमुख वर्षा पितळे, कोल्हापूर विधानसभा संपर्क प्रमुख प्राची पोतदार, दक्षिण कराड विधानसभा संपर्क प्रमुख रोहीणी लोंढे, मुक्ताईनगरचे उबाठाचे विष्णू राणे, भुसावळमधील उबाठाचे आदित्य राणे या पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.

Web Title: Municipality Election Plan ON as Hundreds of workers from Sangli, Ratnagiri, Pune, Kolhapur join Eknath Shinde Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.