NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 18:57 IST2025-12-19T18:50:52+5:302025-12-19T18:57:04+5:30
NCP Ajit Pawar Group Sunil Tatkare News: प्रत्येक मनपातील राजकीय परिस्थिती वेगळी आहे. कार्यकर्त्यांच्या भावना जरूर असतात. परंतु महायुती म्हणून चर्चेच्या अनेक फेरी घडवाव्या लागतात, असे नेते म्हणाले.

NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
NCP Ajit Pawar Group Sunil Tatkare News: राज्यातील २९ महानगरपालिकेच्या निवडणूका जाहीर झाल्या असून दिनांक २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. अशावेळी त्या-त्या जिल्ह्यासाठी नेमलेले समन्वयक, शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांच्यासमवेत आढावा बैठक घेतल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शुक्रवारी रात्री राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यावेळी चर्चा होईल. राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनाही याची माहिती दिली जाईल. कदाचित आमची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठक अपेक्षित आहे. ती बैठक झाली तर राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांना महायुती म्हणून सामोरे जायचे, यावर धोरण ठरवले जाईल, असे स्पष्ट मत सुनील तटकरे यांनी व्यक्त केले.
मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार
महायुतीबाबत ठिकठिकाणी वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलल्यानंतर भाजपा प्रभारी यांच्याशी चर्चा करत आहे. त्यामुळे या सर्व निवडणूका महायुती म्हणून सामोरे जाण्याचे धोरण ठरले जाईल, असे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सुनिल तटकरे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
दरम्यान, प्रत्येक महानगरपालिकानिहाय राजकीय परिस्थिती वेगवेगळी आहे. ज्या ठिकाणी सत्ता आहे ते अधिक संख्याबळ मागणे हे स्वाभाविक आहे. कार्यकर्त्यांच्या भावना जरुर असतात परंतु महायुती म्हणून चर्चेच्या अनेक फेरी घडवाव्या लागत असतात. परंतु महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनुकूल आहे असेही सुनील तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांवर बोलताना सांगितले.